गायत्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद!
शिक्षण विश्व; जीपलाईन आणि क्लाइमिंग'च्या साहसी खेळांना विद्यार्थ्यांची विशेष पसंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Amit-Satam-15-1-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड : साहसी खेळांबरोबरच मनोरंजन पर कार्यक्रमांचा आस्वाद घेत गायत्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचा आनंद लुटला. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोशी व चऱ्होली शाखेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे खेड शिवापूर येथील ‘रॉकस्पोर्ट्स एडवेंचर पार्क’ येथे आयोजित करण्यात आले होते. या सहलीचे आयोजन संस्थाध्यक्ष विनायकराव भोंगाळे ,व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील, विश्वस्त सरिता विखे पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी पार्क मधील विविध खेळांचा आनंद लुटत आपल्यामधील साहसांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामध्ये जीपलाईन आणि क्लाइमिंग सारख्या साहसी खेळांना विद्यार्थ्यांनी विशेष पसंती दिली. विशेष म्हणजे या पार्कमध्ये चिमुकल्यांसाठी साहसी खेळांबरोबरच मनोरंजन पर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
हेही वाचा – हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसकडून जिल्हा परिषद शाळेस डिजिटल स्मार्टबोर्ड
आपापल्या वर्गशिक्षकांबरोबर हसत खेळत सर्व विद्यार्थ्यांनी या सहलीचा मनमुराद आनंद लुटला. जाताना येताना प्रवासादरम्यान गप्पागोष्टी गाणी गात, हसत नाचत हर्षोल्लासात सहल संपन्न झाली. त्यासाठी संस्थेच्या दोन्हीही शाखेचे उपप्राचार्य,प्राचार्य यांनी अनमोल मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य मोलाचे ठरले.
सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामूहिक जीवनाची गोडी वाढते. विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्तप्रियता, सहकार्याची वृत्ती, स्वावलंबन, नेतृत्वगुण, सामाजिक जाणिवांचे संवर्धन असे गुण सहलींमधून जोपासले जातात. समाजात कसे वावरावे, चारचौघांत मिळून-मिसळून कसे वागावे, ह्याचे धडे सहलींच्या अनुभवातून प्रत्यक्षपणे मिळतात. त्यामुळे या सहलीचे नियोजन करण्यात आले.
– कविता कडू पाटील, व्यवस्थापकीय संचालिका.