‘बाळासाहेबांची शिवसेन फोडण्यासाठी मनसेचा वापर’; संजय राऊतांचा दावा

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. सगळं जग हे सांगतं आहे की ईव्हीएम घोटाळा आहे. जर निवडणूक आयोग हे म्हणत असेल की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही तर निवडणूक आयोगात घोटाळा आहे. सगळ्या जगाने ईव्हीएम नाकारलं आहे आणि हे शहाणे आले आहेत का? राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना बक्षीस देतील अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच, त्यांनी राज ठाकरेंवरही गंभीर आरोप केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, घटनात्मक पदावरचे व्यक्ती यांच्याकडून हवी ती कामं करुन घ्यायची आणि त्यानंतर त्यांना बक्षीस द्यायचं, राज्यपाल करायचं, राजदूत म्हणून कुठे पाठवायचं हेच सुरु आहे. महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला, हरियाणात झाला आहे. निवडणूक आयोगाने मरकवाडीला येऊन बसलं पाहिजे, मरकवाडीच्या जनतेची मागणी होती की ते स्वखर्चाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार होतं. मग राजीव कुमार यांना तफावत दिसली असती. निवडणूक यंत्रणा भाजपाने हायजॅक केली आहे, लोकशाही हायजॅक केली आहे. लोकशाहीचं रक्षण करणारे चाचेगिरी करत आहेत. दिल्ली निवडणुकीतही मतदार यादीतला घोटाळा होतो आहे. महाराष्ट्रातही तेच झालं, हरियाणातही तेच झालं. निवडणूक आयोग सरकारच्या ताटाखालचं मांजर झाला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा – राज्यावर दुहेरी संकट! शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी
शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेल यांना सांगितलं गेलं आहे की खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की तुम्हाला मंत्रिपद मिळेल. देशाला त्याचा काहीही उपयोग नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे फोडाफोडीचा नीच आणि निर्ल्लज प्रकार सुरु आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा तुम्ही जिंकला आहात तरीही तुमची फोडाफोडीची भूक भागत नाही. कार्यकर्ते, आमदार, खासदार फोडाफोडी सुरु आहे. देशाचं भाग्य तुम्ही काळ्या शाईने लिहिणं चालवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंच्या मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कुणाविरुद्ध होतो आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात होतो आहे. हा वापर मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी होतो आहे एवढंच मी सांगेन, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता यावर राज ठाकरे उत्तर देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.





