‘रोहित कर्णधार नसता तर संघातच नसता’; इरफान पठाणचं मोठं वक्तव्य
![Irfan Pathan said that if Rohit was not the captain, he would not have been in the team.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Irfan-Pathan-and-Rohit-Sharma-780x470.jpg)
Rohit Sharma | ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव झाला. यासह टीम इंडियाची मालिकेत १-२ अशी पिछाडी झाली. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला टीकेचा सामना करावा लागत आहे. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केला आहे.
इरफान पठान नेमकं काय म्हणाला?
एक खेळाडू ज्याने जवळपास २०,००० धावा केल्या आहेत, तरीही रोहित ज्या प्रकारे संघर्ष करत आहे, त्यावरून असे दिसते की त्याचा फॉर्म त्याला साथ देत नाही. आता काय होतंय की तो कर्णधार आहे म्हणून खेळतोय. तो कर्णधार नसता तर कदाचित आत्ता खेळताना दिसला नसता. तुमची एक निश्चित टीम असती. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला खेळत असते. शुबमन गिल देखील संघात असता. वास्तविकतेबद्दल बोलायचे झाले तर, रोहित ज्या पद्धतीने खराब फॉर्मशी झगडत आहे, त्याचा विचार केला तर कदाचित त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसते. मात्र, तो कर्णधार आहे आणि भारताला पुढचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. म्हणून तो संघात आहे, असं इरफान म्हणाला.
हेही वाचा – पवार कुटुंब एकत्र यावं; अजित पवार यांच्या मातोश्रींचं विठूराया चरणी साकडं
रोहितचा फॉर्म खूपच खराब आहे. भारतात येण्यापूर्वीही तो धावा काढत नव्हता आणि अजूनही त्याने धावा केल्या नाहीत. जेव्हा मी रोहित शर्माला फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा ते खूप निराशाजनक दृश्य असते. कारण जेव्हाही मी रोहित शर्माला फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा मला त्याची फटकेबाजी पाहायची असते. कसोटी क्रिकेट असो वा एकदिवसीय क्रिकेट, पण आता त्याचा फॉर्म, त्याची वाटचाल, त्याची मानसिकता असो की शरीराशी असलेला समन्वय, मला ते अजिबात दिसत नाही, असंही इरफान पठाण म्हणाला.