डॉ. मनमोहन सिंग : भारताचं शापित नेतृत्व !
देशाचे यशस्वी नेतृत्व करण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते, असे मुळीच नाही. त्यासाठी लागते ती प्रगल्भता, सारासार विचार करण्याची कुवत, आपल्या साथीदारांवर असणारा वकूब आणि सर्वसामान्य परिस्थिती लक्षात घेऊन उचललेले पाऊल किंवा निर्णय ! एखाद्या विषयात प्रचंड हुशारी हा यशस्वी पंतप्रधानाचा निकष होऊ शकत नाही.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले. ते अत्यंत वाकबगार नेते होते, जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी देशाची आर्थिक घडी रुळावर आणली, किंबहुना, आत्ता भारत आर्थिक आघाडीवर ज्या जोमाने वाटचाल करीत आहे, त्याचा पाया डॉक्टर साहेबांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी रचला, हे मान्यच करावे लागेल ! एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कमजोर गोष्टींवर बोट ठेवणे योग्य नाही, हे सुद्धा मान्य ! पण, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर किंवा चुकीच्या कृतींवर काहीच बोलायचे नाही हा न्याय कुठला ? देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या निधनानंतर, ‘त्यांना श्रद्धांजली वाहणार नाही,’ असे उद्गार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते, त्यांनी आयुष्यात उचललेल्या पावलांवर जबरदस्त टीकाही केली होती. अशी टीका करण्याचे धाडस, किंवा आपला मुद्दा पटवून देण्याची कुवत असावी लागते. म्हणूनच तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातील पत्रकार, लेखक त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असताना सहज विचार चमकून गेला, की आमच्या या नेत्याने आयुष्यात ज्या चुकीच्या गोष्टी केल्या, किंवा त्या घडत असताना त्याकडे डोळे झाक केली, हे पुढील पिढीला समजायलाच हवे.
कंठ का दाटून येतोय ?
आपल्या देशात अनेकदा कोल्हेकुईचे राजकारण सुरू असते. एक कोल्हा ओरडायला किंवा रडायला लागला की बाकीच्यांना अचानक उमाळा येतो आणि त्यांचीही रडारड सुरू होते. काही उजव्या विचाराच्या, ढोंगी राष्ट्रभक्तांना सुद्धा अचानक डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कंठ दाटून आला आहे. अचानक ‘मरणान्तानी वैराणी’ चा उमाळा फुटला आहे. अशा समस्त कमकुवत, मंद, निरागस, भोळसट विचार करणाऱ्यांसाठी आणि त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी या विषयावर प्रकाशझोत टाकण्याची वेळ आली आहे. स्पष्ट लिहिण्यामुळे डॉक्टर साहेबांविषयीच्या आदरामध्ये किंचितही घट झालेली नाही. जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ म्हणून आजही ते आमचा आणि माझ्यासारख्या लाखोंचा आदर्शच आहेत, हे पुन्हा एकदा निक्षून सांगावेसे वाटते.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या काळात काँग्रेसकडे सत्ता गेली असताना सोनिया गांधी या नेतृत्व करू शकत नव्हत्या, त्यामुळे सर्व समावेशक नाव म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव पुढे आले. त्यामुळेच त्यांना ‘ॲक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ असे म्हटले गेले. याचाच अर्थ ते अपघाताने पंतप्रधान बनले, हे वेगळे सांगायला नको. एवढे महत्त्वाचे पद एखाद्या व्यक्तीकडे एकमताने जाणे हे वेगळे आणि एखाद्या व्यक्तीला त्या पदावर बसवणे वेगळे ! पंतप्रधानपद हे डॉक्टरसाहेबांवर लादले गेल्यामुळे त्यांच्याच पक्षात त्यांच्याबद्दल आदराची भावना मुळीच नव्हती, हे वेळोवेळी त्यांच्याच पक्षातील अनेक नेत्यांनी सिद्ध केले आहे. त्यावेळी काँग्रेसचे क्रमांक दोनचे नेते राहुल गांधी यांचे डॉक्टरसाहेबांशी असलेले वर्तन नेहमीच असभ्यपणाचे आणि निषेधार्हच होते. राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेत्याने केवळ आपण गांधी घराण्यातील आहोत म्हणजेच श्रेष्ठ आहोत, हे दाखवण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय कराराची कागदपत्रे पत्रकार परिषद बोलावून सर्वांसमोर राहुल गांधी यांनी टराटरा फाडली होती, हे अवघ्या देशाने दूरदर्शनवर पाहिले आहे.
आज म्हणूनच असे म्हणण्याची वेळ आली आहे, की ‘मरणान्तानी वैराणी’ वगैरे सर्वसामान्य माणसांमध्ये ठीक असतं. पण राष्ट्राचा विचार करताना हा नियम बाजूलाच ठेवावा लागतो. आपण कशाच्या आधारावर ठरवतोय, की हा मनुष्य देशभक्त होता आणि याने देशाची सेवा केली? दुर्दैवाने असे म्हणावे लागते की, डॉ. मनमोहन सिंग यांनी आयुष्यभर फक्त गांधी-नेहरु घराण्याची सेवा केली. एकेक उदाहरणे चाळून पाहा म्हणजे तथ्य बाहेर येईल.
उदाहरणे तर किती द्यायची ?
डॉक्टर साहेबांनी, ‘शर्म अल् शेख’ या ठिकाणी भारताची मान शरमेनं खाली जाईल, असं कृत्य केलं. भारत बलुचिस्तानमध्ये ऑपरेशन्स करत आहे, हे अधिकृतरीत्या बोलून आपल्या बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत चुकीच्या ठिकाणी केला आणि पंतप्रधानपदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते तिला हरताळ फासला, हे आठवत असेलच. त्यांच्याच काळात उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी इराणमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय गुप्तहेरांची यादी इराणला दिली. इराणने ताबडतोब कारवाई करुन त्या गुप्तहेरांचा सफाया केला, हा इतिहास सुद्धा ताजा आहे. लक्षात घ्या, देशाचे हित सांभाळण्यासाठी ज्यांची नियुक्ती झाली, त्यांनी एका रात्रीतच इराणसारख्या देशातील आपले ‘डीप ॲसेट्स’ संपवून टाकले. आजही माजी नौदल कमांडर कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या कैदेत आहेत, त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न सुद्धा आज फोल ठरत आहे, ती देणगी सुद्धा यांचीच !
डॉक्टर साहेब पंतप्रधान असताना उपराष्ट्रपतींचं हे कृत्य म्हणजे खरंतर देशद्रोहाचा मामला असून त्यांच्यावर महाभियोग चालवायला हवा होता, त्यांना पदमुक्त करुन कैदेत टाकायला हवं होतं. पण, यापैकी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काहीच केलं नाही, केवढे हे लांगुनचालन ! देशद्रोह्याला पाठीशी घालण्याचा करंटेपणा त्या काळात आपल्या पंतप्रधानांनी केला होता, हे लक्षात घ्या.
आपल्या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्यांचा आहे, असलं भयंकर विधान डॉ. मनमोहन सिंग नावाच्या नेत्यानं केलं होतं, त्याची फळं आपण आज देखील भोगत आहोत, एवढी क्रूर थट्टा त्यांनी देशाची करून ठेवली आहे. यांच्याच काळात देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या आठवणीने सुद्धा आज थरकाप उडत आहे. त्या हल्ल्याचे ‘मास्टर माईंड’ पाकिस्तानात होते, असं जरी आपण म्हणत असलो, तरी भारतीय संरक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणतात, की त्यात तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकार आणि प्रशासनात असलेली बडी धेंडं देखील त्या हल्ल्यात सहभागी होती. नंतरच्या काळात त्यावर लेखच्या लेख आणि पुस्तकेच्या पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
देशाचं नाक कापणारा २६/११ चा हल्ला होऊ देणं आणि झाल्यावर तो ज्या पद्धतीनं हाताळला, त्यातून या माणसाचं ढिसाळ नेतृत्व आणि शून्य कर्तृत्व लख्खपणे चव्हाट्यावर आलं आहे. डॉ. मनमोहन सिंग सरकार हे अनेक आर्थिक घोटाळ्यांनी बरबटलेलं सरकार होतं. पंतप्रधानांचा कसलाच धाक, वचक, वकूब न राहिल्यामुळे त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वापासून खालपर्यंत जो तो मनमानी कारभार करत होता, शक्य आहे, त्या ठिकाणी हात मारत होता, देशाची मालमत्ता खासगी असल्याप्रमाणं दरोडे टाकत होता.
मुलगी सोरोस संघटनेत सक्रिय
डॉ. मनमोहन सिंग यांची मुलगी डीपस्टेट सोरोसच्या संघटनेत काम करते, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. देशाची सेवा या माणसानं आणि त्याच्या परिवारानं कधीच केलेली नाही. सोनेरी वर्खाखाली सडलेलं अन्न असावं, सडका मेंदू असावा अशी ही गोष्ट आहे.
ज्या गोष्टीला आपल्या देशात अतिशय मानलं जातं किंवा महत्त्व असतं, त्यादेशसेवेच्या आणि सभ्यपणाच्या मुखवट्याआड लपलेला राष्ट्रहिताला नख लावणारा भेसूर चेहरा, हीच डॉ. मनमोहन सिंग यांची खरी ओळख आहे, हे लक्षात घ्या आणि इतिहासाचं पुन्हा अवलोकन करा. त्यांचं निधन झालं, म्हणून या भयावह गोष्टी आणि देशद्रोहीपणाचे मुद्दे विसरुन जाता कामा नयेत, त्यांची पुन्हा शहानिशा करायला हवी.
देशसेवा, देशप्रेम हेच सर्वश्रेष्ठ
राष्ट्रहिताचा विचार करताना कुणी खरोखर राष्ट्रसेवा केली आणि कोण बांडगुळासारखे राष्ट्रहितरस शोषत राहिलं, याचं भान सतत ठेवायलाच हवं. तुम्ही त्यांना अर्थतज्ज्ञ म्हणा, उच्चपदस्थ म्हणा, उच्चशिक्षित म्हणा, हुशार म्हणा, वाट्टेल ते म्हणा, पण त्यांनी देशसेवा केली, हे मात्र दहा हजार टक्के अमान्यच करायला हवं. मनुष्याच्या निधनानंतर उदो उदो करण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत त्याचा पूर्णपणे निषेधच करायला हवा.
आपल्या देशातील देशप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना अशा भयंकर आंतरराष्ट्रीय षडयंत्राबाबतीत काहीच माहीत नसतं आणि ज्यांना माहित असतं ते बेधडकपणे बोलणं अथवा लिहिणं टाळतात, पण जेव्हा भारतमातेच्या रक्षणार्थ सैनिक, गुप्तहेर व नागरिक सुध्दा बळी पडतात, तेव्हा अशा गोष्टी समाजासमोर येणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा,अशा ऐतिहासिक घटना गाडून टाकून तोच पक्ष शिरजोर होऊन निर्ल्लजपणे काहीच घडलं नाही, अशा अविर्भावात वावरून आपले नीच राजकीय डावपेच करत राहतो. डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना हेच त्यांचे स्तुतीपाठक नक्राश्रू ढाळतात आणि डॉ. मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ द्या अशी मागणी पुढे आणतात. पण, या नतद्रष्टांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ओकलेली गरळ देशप्रेमी लोक कधीच विसरत नाहीत, हे पण लक्षात घ्या !





