‘२४ तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..’; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Prakash Ambedkar | परभणीत संविधानाच्या प्रतिची विटंबना करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. त्यानंतर परभणीत आज बंदची हाक देण्यात आली. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या काही गाड्यांवरही दगड फेकले. ज्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं असून शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला इशारा दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, की बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनांमुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा. तसेच, येत्या २४ तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
हेही वाचा – सोसायटीधारकांचा संताप: कुदळवाडी येथील भंगार दुकाने तात्काळ हटवा!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध.





