Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

Warna River Kolhapur : कोल्हापुरात वारणा नदी पात्रात दूषित पाणी; हजारो मृत माशांचा खच, दोन मगरींचा मृत्यू

Contaminated Water River : नदीमध्ये दूषित पाणी आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन

सांगली: वारणा नदीत दूषित पाणी आल्याने मृत माशांचा खच पडला तर दोन मगरींचाही मृत्यू झाला आहे. नदी पात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्यामुळे पाणी दूषित झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. तसेच मृत मासे गोळा करून शहरातील काही विक्रेते मासे विक्रीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर सध्या शेती कामासाठी नदीतील पाण्याचा वापर होत असल्याने शेती पिकांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

प्रत्येक वर्षी ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर नदीत दूषित पाणी मिसळण्याचा प्रकार गेली अनेक वर्षे सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वारणा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दूषित सांडपाणी नदीत सोडणे, मासेमारीसाठी घातक गोष्टींचा वापर करणे आदींमुळे वारणा नदी प्रदूषित झाली आहे. दरम्यान, नदीमध्ये दूषित पाणी आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

माशांबरोबर मगरींचाही मृत्यू

वारणा नदीत रविवारी (ता.०८) मगरीचे मृत पिलू आढळले होते. हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी (ता.०९) उदगाव-अंकली पुलाखाली कृष्णा नदीत महाकाय मगर मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळली. उदगाव येथील मच्छीमारांनी कोल्हापूर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. परंतु, या मगरीचा मृतदेह पुढे सापडला नाही.

दरम्यान, रविवारी (ता.०८) मगरीच्या पिलाचा व माशांचा वारणा नदीत दुधगाव, कवठेपिरान येथे मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने संयुक्त पाहणी केली. वारणा आणि कृष्णा नदीतील पाण्याचे जागोजागीचे नमुने घेण्यात आले. यामध्ये नदीच्या पाण्यात मळी सोडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

कोल्हापुरातील कारखान्यातून मळी सोडली

कोल्हापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यातून वारणा नदीत मळीमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू आहेत, असे सांगण्यात आले.

वारणेत मृत माशांचे ढीग

वारणा नदीत सोमवारी (ता.०९) सकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले. काही तरुणांनी मोठ्या प्रमाणात मासे गोळा करून नदीतून बाजूला काढले. दरम्यान, रविवारी मृत अवस्थेतील मासे गोळा करून एका गाडीतून कुणीतरी नेले, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आली. या विभागाने त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button