‘किमान ज्येष्ठांनी तरी दिशाभूल करू नये’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मतांच्या आकडेवारी मांडत विधानसभा निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेची आकडेवारी मांडत शरद पवारांचा दावा खोडून काढतानाचा किमान ज्येष्ठ नेत्यांनी तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालात मतांमध्ये फारसे अंतर नसताही सत्ताधारी महायुतीला अधिक जागा मिळाल्याचा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला. त्याला आता फडणवीसांनी उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत फडणवीस यांनी जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा, या प्रश्नाला उत्तर दिले. त्यासाठी २०२४ च्या लोकसभेतील आकडेवारी मांडली. या निवडणुकीत भाजपला १ कोटी ४९ लाख १३ हजार ९१४ मते मिळाली आणि ९ जागांवर विजय मिळविता आला. तर, काँग्रेसला ९६ लाख ४१ हजार ८५६ मते मिळाली पण त्यांच्या जागा १३ झाल्या. तर, शिवसेनेला ७३ लाख ७७ हजार ६७४ मते आणि ७ जागा मिळल्या. तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८ लाख ५१ हजार १६६ मते मिळूनही ८ जागा मिळाल्या.
हेही वाचा – ‘गृहमंत्रीपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे..’; देवेंद्र फडणवीसांची भूमिका
यासोबतच, २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७ लाख ९२ हजार २३७ मते होती आणि जागा केवळ १. त्याचवेळी तत्कालीन राष्ट्रवादीला ८३ लाख ८७ हजार ३६३ मते होती आणि जागा मात्र ४ निवडून आल्या’, असे फडणवीस यांनी आकडेवारीतून नमूद केले आहे. त्याचवेळी, शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान, आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.





