‘गौतम अदाणींनीच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं’; संजय राऊत यांचं विधान

मुंबई | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळावणी करून सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रावादी आणि भाजपाच्या युतीसाठी मोठ्या उद्योगपतीच्या घरात ही चर्चा झाली होती, असं अजित पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गौतम अदाणींनीच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, अशी कबुली अजित पवारांनी दिली असल्याचं संजय राऊतांनी महटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, की महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी जी बैठक झाली. त्या बैठकीला गौतम अदाणी हजर होते. गौतम अदाणी, अमित शाह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मविआ सरकार पाडण्याचा कट शिजला. तेव्हा कोणाच्या अंगात आलं होतं ते तपासलं पाहजे. आम्ही (मविआ) अडीच वर्षे खूप चांगल्या प्रकारे सत्ता राबवली. परंतु, गौतम अदाणींना ते सरकार नको होतं. ही मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून वेगळी करून बळकवायची आहे. त्यांना मुंबई गिळून टाकायची आहे.
हेही वाचा – महायुतीला किती जागा मिळणार? एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा
गौतम अदाणीला मुंबई विकत घ्यायची आहे, महाराष्ट्रापासून ओरबाडायची आहे. म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा वापर करून शिवसेना तोडली, सरकार पाडलं. ही गोष्ट मी सांगत नाहीये. ही गोष्ट त्यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना तोडण्यामागे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याागे गौतम अदाणी होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे गौतम अदाणी होते, हे अजित पवारांनी कबुल केलं आहे. यापेक्षा मोठा कोणता पुरावा असू शकतो का? नरेंद्र मोदी, अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांनी ही मुंबई, हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा, महाराष्ट्र तोडण्याचा डाव रचला होता. त्यात ते यशस्वी झाले. मुंबई, महाराष्ट्र वाचवण्यासाठी आमची लढाई चालू आहे, असं संजय राऊत म्हणाले.
गौतम अदाणी व त्यांच्या व्यापारी वृत्तीविरोधात आम्ही लढत आहोत. मोदी व अदाणी हे एकच आहेत. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व गौतम अदाणी हे एकच आहेत. या लोकांना महाराष्ट्राची सुत्र गौतम अदाणीकडे सोपवायची आहेत. परंतु, शिवसेना तसं होऊ देणार नाही. शिवसेना त्यांच्या मार्गात अडथळा बनली होती. म्हणूनच अदाणी, शाह, मोदी व फडणवीसांनी राज्यातलं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं, असंही संजय राऊत म्हणाले.





