अजित पवारांनी सिंचन घोटाळा चौकशीचं खापर आर.आर. आबांवर फोडले; म्हणाले..

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप भाजपाने केला होता. अजित पवार यांच्या विरोधात गाडीभरून पुरावे असल्याचा दावा तेव्हा भाजपा नेत्यांनी केला होता. आता या आरोपांवरून अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याचे खापर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर फोडले आहे. तासगाव-कवठे महांकाळ येथील सभेत बोलत असताना अजित पवार यांनी हे विधान केले आहे.
अजित पवार म्हणाले, की केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली होती. ती फाईल गृहखात्याकडं गेल्यानंतर आर. आर. पाटीलनं माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसानं गळा कापयाचे धंदे झाले राव. नंतर आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागली.
हेही वाचा – सामाजिक संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रपती राजवट लागल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. निवडून आलेलं सरकार यावर निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार निवडून आलं. फडणवीस यांनी फाईलवर स्वाक्षरी केली. त्यांनी मला घरी बोलावलं आणि फाईल दाखवली. ते म्हणाले, तुमच्या आबाने तुमची चौकशी करण्यासाठी या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आता मला मुख्यमंत्री म्हणून सही करावी लागेल. मला त्यादिवशी खूप वाईट वाटलं, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
मला एकदा गृहमंत्रालय द्या, असं मी अनेकदा माझ्या नेत्यांना सांगितलं होतं. मला वेडं-वाकडं खपतच नाही. एकेकाला सरळ केलं असतं. माझा कार्यकर्ता चुकला तरी त्याला टायरमध्ये टाका म्हणण्याची माझ्यात धमक आहे. आर.आर. गेल्यानंतर स्मिताच्या लग्नासाठी मी उभा राहिलो. माझ्या जिजाई बंगल्यात लग्न झालं. मी उपकार केले नाहीत. तर सहकाऱ्याच्या मुलीसाठी मी केलं होतं, असंही अजित पवार म्हणाले.





