ताज्या घडामोडीराजकारण

वाई विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ : खासदार डॉ. अमोल कोल्हे

शरद पवारांच्या यशवंत विचाराची प्रतारणा करणाऱ्या गद्दारांना मतदारांनी धडा शिकवावा

वाई : आपल्या समोर महायुतीचा उमेदवार कितीही तगडा आणि मातब्बर असला, तरी त्याला घरपोच करण्याची मनात इच्छा आणि आपली एकजूट असेल, तर वाई विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केले. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या यशवंत विचाराची प्रतारणा करणाऱ्या गद्दारांना मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथील चित्रा टॉकीजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी सेलचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला अध्यक्षा संजना जगदाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले, ‘‘शरद पवार यांची साथ सोडून विकासासाठी सत्तेत गेलेल्या विद्यमान आमदारांनी अडीच वर्षांत विकास झाला, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अनेक फसव्या योजना का जाहीर केल्या, याचे उत्तर द्यावे. आज महागाई, बेरोजगारी वाढली असून, कांदा, सोयाबीन, दुधाला दर नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना १५०० रुपयांची भीक नको, तर सुरक्षिततेचा, तरुणांना रोजगाराचा, शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभावाचा हक्क पाहिजे आहे. त्यासाठी महाविकास आघाडी स्वाभिमानाची लढाई लढत आहे.’’

भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा असे म्हणत गुलाबी जॅकेट घालणाऱ्यांनी गुजरातच्या गुलामगिरीची झूल पांघरली असल्याची टीका नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी केली. जयंत पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतरही शरद पवार यांच्या नेतृत्वाला नवीन पिढीची साथ मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर विजय मिळाला. सातारा लोकसभा मतदारसंघात ‘पिपाणी’ चिन्हाने घात केला नाहीतर विजय निश्चित होता. तरीही प्रस्थापितांच्या विरोधात चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे महायुती सरकार गोंधळले आहे. त्यांनी अडीच वर्षांत विकासाच्या पोकळ घोषणा आणि निवडणुकीच्या तोंडावर अनेक फसव्या योजना जाहीर करून राज्याची तिजोरी मोकळी केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी बजेटमध्ये शीर्षक नाही.

राज्यात माजी मंत्री, राजकीय नेते तसेच अल्पवयीन मुली, माताभगिनी असुरक्षित आहेत. वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी, महागाई यामुळे सामान्य जनता त्रासली आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली असून, त्यासाठी नवा चेहरा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. उमेदवारापेक्षा आपल्याला विजय महत्त्वाचा असून, त्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वांनी पुढे यावे.’’ आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘वाई मतदारसंघात शरद पवार यांचा विचार रुजला असल्याचे लोकसभा निवडणुकीत अनुभवले. सोबत नेता नसताना आपल्याला या मतदारसंघात सात हजारांचे मताधिक्य मिळाले. हा ट्रेलर होता अजून पिक्चर बाकी आहे.

माजी मंत्री मदनराव पिसाळ तसेच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या घराण्याने उमेदवारी मागितली ही पक्षाच्या जमेची बाजू आहे.’’ यावेळी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी अभिनेत्री अश्विनी प्रदीपकुमार महांगडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेब पाटील, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे यांची भाषणे झाली. डॉ. नितीन सावंत, ॲड. नीलेश डेरे, यशराज भोसले, अनिल जगताप, ॲड. विजयसिंह पिसाळ, रमेश घायगुडे या इच्छुकांनी शरद पवार देतील त्या उमेदवाराला विजयी करण्याची ग्वाही दिली. तालुकाध्यक्ष दिलीप बाबर, सुभाष कारंडे, डॉ. सतीश बाबर, कैलास जमदाडे, केदार गायकवाड, संतोष शिंदे, हरीश गोळे यांनी स्वागत केले. प्रसाद सुर्वे यांनी प्रास्ताविक केले.

वाई-खंडाळा तालुक्यात पाच धरणे असून, सरकारला दुष्काळी तालुके जाहीर करावे लागले. हा विद्यमान लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आहे. शेतीमालाला भाव नसताना ते कधीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. उच्च शिक्षणासाठी तरुण विद्यार्थी बाहेर जातात. रोजगाराचा प्रश्न गंभीर असून, खंडाळा- शिरवळ येथे स्थानिकांना वॉचमनची नोकरी दिली जाते, अशी टीका डॉ. नितीन सावंत यांनी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button