अफाट टाटा समूहाचा कोण उत्तराधिकारी?
रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांचे तीन मुलं, माया, नेव्हिल, लेआ टाटा हे संभाव्य उत्तराधिकारी
![vast, group, succession, Ratan Tata, brothers, Noel Tata, children, Maya, Neville, Leah Tata probable,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/ratan-tata-vars-780x470.jpg)
मुंबई : रतन टाटा यांना काळाने आपल्यातून हिरावून नेले. मुंबईतील ब्रीच कँडी येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. केवळ एक उद्योजकच नाही तर भला माणूस म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठसठशीत होती. ते अनेक नवउद्योजकांचे आदर्श आहेत. अनेकांना त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा मिळाली आहे. पायाशी श्रीमंती लोळत घेत असताना त्यांनी त्याचा कधीच बडेजाव केला नाही. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात आपलं द्वेष करणारं कोणी नाही, हे त्यांचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. असा सन्मान भारतातील कोणत्याही व्यावसायिकाला कमावता आलेला नाही. आता त्यांच्यानंतर अफाट टाटा समूहाचा नवीन मालक कोण? याची चर्चा होत आहे. टाटा समूहाचा कोण आहे उत्तराधिकारी?
कोण असू शकतो वारस?
रतन टाटा यांच्यानंतर या पदाची प्रतिष्ठा सांभाळणार कोण? याविषयी चर्चा होत आहे. रतन टाटा यांनी याविषयीची व्यवस्था अगोदरच करून ठेवली होती. सायरस मिस्त्री यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर रतन टाटा यांनी सावधगिरीने पावलं टाकली. सध्या एन. चंद्रशेखर हे टाटा समूहाच्या टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. सात वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांना ही जबाबदारी मिळाली होती. त्यांच्या कुटुंबातील सदस्य व्यवसायाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. कुटुंबातील अनेक सदस्य हा वारसा नेटाने पुढे नेऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांच्याकडे हा वारसा येऊ शकतो. त्यांची तीन मुलं, माया, नेव्हिल, लेआ टाटा हे संभाव्य उत्तराधिकारी असू शकतील.
माया टाटा
34 वर्षीय माया टाटा या सध्या टाटा समूहात उच्च पदावर कार्यरत आहे. तीने टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटल संस्थांमधील प्रमुख पदी काम केले आहे. तर टाटाच्या नवीन ॲप लाँचमध्ये तिची विशेष भूमिका आहे.
नेव्हिल टाटा
नेव्हिल टाटा हा सध्या 32 वर्षांचा आहे. तो टाटा समूहाच्या कौटुंबिक व्यवसायात सक्रिय आहे. टोयोटा किर्लोस्कर समूहाच्या मानसी किर्लोस्कर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. तो सध्या स्टार बाजारचा प्रमुख आहे. त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नेव्हिल याच्यावर आहे.
लीह टाटा
39 वर्षीय लीह टाटा ही टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अग्रेसर आहे. स्पेनमधील IE बिझनेस स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. लीहने टाटा हॉटेल्स, रिसॉर्टस आणि पॅलेसमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. सध्या ती समूहातील भारतीय हॉटेल्सचे व्यवस्थापन सांभाळत आहे.
टाटा समूह 400 अब्ज डॉलर्स
एका अहवालानुसार, ऑगस्ट 2024 पर्यंत, टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप $400 अब्ज होते. म्हणजे जवळपास 35 लाख कोटी रुपयांच्या घरात हा समूह होता. सध्या समूहाच्या 29 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या आहेत. टाटा कन्सल्टन्सी ही समूहातील सर्वात मोठी कंपनी आहे. या 9 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनीचे मार्केट कॅप 15,38,519.36 कोटी इतके रुपये होते.