‘वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे’; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Veer Savarkar | वीर सावरकर चित्पावन ब्राह्मण होते, तरीही ते सार्वजनिक ठिकाणी गोमांस खात असत असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधले मंत्री दिनेश गुंडूराव यांनी केलं आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
दिनेश गुंडूराव नेमकं काय म्हणाले?
वीर सावरकर चित्पावन ब्राह्मण होते, तरीही ते सार्वजनिक ठिकाणी गोमांस खात असत. महात्मा गांधी हे हिंदू सांस्कृतिक रुढीवादाचा मूर्तीमंत उदाहरण होते. मात्र ते कट्टर शाकाहारी होते. तसंच गांधीजी हे लोकशाहीवादी नेते होते. मोहम्मद अलि जिना हे कट्टर नव्हते पण वीर सावरकर कट्टर होते. काही लोक असाही दावा करतात की जिना निषिद्ध असलेल्या डुकराचं मांस चवीने खायचे. मात्र जिना मुस्लिमांचे हिरो ठरले होते, असं दिनेश गुंडूराव म्हणाले.
हेही वाचा – आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिलं नाही तर..; मनोज जरांगेचा सरकारला इशारा
नथुराम गोडसेच्या विचारांची पाळंमुळं घट्ट होत आहेत असाही दावा दिनेश गुंडुराव यांनी केला. याच विचाराने महात्मा गांधी यांची हत्या केली. महात्मा गांधी धार्मिक होते, सध्याच्या घडीला मात्र कट्टरतावाद फोफावतो आहे. गोरक्षणाच्या नावाखाली कुणालाही मारहाण करण्यात येते. हे विचार वीर सावरकरांचे नाहीत. सावरकरांच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी गांधींचे विचार आजही प्रेरक आहेत, असंही दिनेश गुंडुराव म्हणाले.
दरम्यान, भाजपाने दिनेश गुंडुराव यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. भारत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही. त्यांच्याकडून काँग्रेसने अद्याप कोणताच बोध घेतला नाही. काँग्रेस स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत नाही हे पुन्हा सिद्ध झाल्याचा दावा ठाकूर यांनी केला.





