‘२०१९ ला तिकिटासाठी पंकजांना ब्लॅकमेल केलं’; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Pankaja Munde | विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये लॉबी करून तिकिटासाठी पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. परळीतील पराभवाची भीती दाखवली, असा खळबळजनक दावा भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन जगताप यांनी केला आहे. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले आहेत. ते बीडच्या माजलगावमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मोहन जगताप म्हणाले, आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं चांगलं सुरू असताना अजित दादाला घेतलं. त्यामुळे निष्ठावान लोकांची अडचण झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करून माजलगाव मतदारसंघात दुसऱ्यांनीच उमेदवारी मिळवली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पंकजा मुंडे यांचा तर पराभव झालाच परंतु माजलगावमधून भाजपा कडून जे उभे होते, त्यांचाही पराभव झाला. आता मात्र यावेळी मी माघार घेणार नाही. निवडणूक लढवणारच.
हेही वाचा – ‘अनुदान कधी मिळेल याचा काहीही भरोसा नसतो’; नितीन गडकरींचं विधान
यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर टीका केली. आमदार हे बाहेरचे गुत्तेदार आणून टक्केवारी घेत आहेत. स्थानिकांना काम देत नाहीत. विकास कामात माजलगाव मतदारसंघ मागे पडलाय. माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. परंतु मी जर त्यांच्यावर वैयक्तिक टीका करायला लागलो, तर त्यांना रस्त्यावर चालने मुश्किल होईल, असंही मोहन जगताप म्हणाले.





