Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘…तरीही लाडकी बहीण योजना सुरू राहणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share On

पुणे : राज्यात १ कोटी ९० लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पुढील वर्षाची आर्थिक व्यवस्थाही सरकारने केली आहे. विरोधक न्यायालयात गेले तरी ही योजना सुरू राहणार. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेली ही योजना नाही.या योजनेची माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचवा, विरोधक लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालत आहेत. या बहिणीच त्यांना त्यांना जोडा दाखवतील, अशी टिपण्णी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली.

पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भुयारी मेट्रोचे लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या भिडेवाड्यातील स्मारकाचे भूमिपूजन यासह राज्यातील छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथील प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथून ऑनलाइन केले.

यानिमित्ताने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, उदय सामंत, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लोहगाव विमानतळाचे टर्मिनस झाले, आता पुरंदर विमानतळासाठी तळासाठी जागा तातडीने अधिग्रहित करा. शेतकऱ्यांना चांगला मोबदला द्या. लवकर काम मार्गी लावा, अशा सूचना शिंदे यांनी केल्या.स्वारगेट स्टेशन पाहिल्यावर अभिमान वाटेल असे झाले आहे. भिडे वाड्याच्या कामासाठी खूप लढा द्यावा लागला. बिडकीन विमानतळामुळे तिथे ५२ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प येत आहेत. रोजगार उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा –  Water supply problem: सोसायटीधारकांच्या पाणी पुरवठाबाबत प्रशासनाचा ‘‘वॉच’’

महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम जागा ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार असून, यासाठी २०० कोटी रुपये देणार आहोत. काहीजण स्वत:च्या कारकिर्दीत काही करू शकले नाहीत, पण आंदोलन करून आडकाठी आणायचा प्रयत्न करत आहेत.हे पुणेकरांनी समजून घ्यावे, असा टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी मारला. यावेळी मोहोळ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ यांचीही भाषणे झाली.

बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे याच्या एन्काउन्टर बाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “त्याला फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या, असे म्हटले जात होते. त्याने पोलिसांवर हल्ला केला तेव्हा पोलिसांनी अॅक्शन घेतली.

पोलिसांनी तसे केले नसते तर त्यांच्यावरच टीका झाली असती. पोलिसांना बंदुका काय शोभेसाठी दिल्या आहेत का, असेच विरोधक म्हणाले असते. या विरोधकांना दादांनी (अजित पवार) बरोबर उत्तर दिले,’ असे सांगून त्यांनी पवारांकडे पाहिले. त्यावर पवारांनी त्यांच्याकडे पाहून हात जोडले.

कार्यक्रम झाल्यावर सर्व नेत्यांनी स्वारगेट ते शिवाजीनगर अशी मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांचे शिवाजीनगर स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

ज्यांनी मेट्रोचा एकही खांब कधी लावला नाही असे काही लोक उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे गेल्याने छाती बडवत होते, अशी टीका फडणवीस यांनी केली. सर्वाधिक वेगाने सुरू झालेली ही देशातील पहिली मेट्रो आहे. स्वारगेट हे पहिले देशातील मल्टीमोडेल स्टेशन आहे.

शहरातील मेट्रोचे उर्वरित टप्पे लवकरच सुरू करण्यात येतील. शहरातील कुठल्याही भागातून मेट्रोने प्रवास करता येईल. याशिवाय सोलापूरला विमानतळ केले आहे, तर विमानसेवाही लवकरच सुरू होणार आहे.विरोधकांनी कितीही ऊर बडवला तरी ते सुरू होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. पाच वर्षांत सर्वात नियंत्रित ट्रॅफिक पुणे जिल्ह्यात असेल यासाठी एक लाख कोटी रुपयांची कामे पुढील साडेचार ते पाच वर्षात करण्यात येतील.

वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम करणारा आजचा कार्यक्रम आहे. फुले दाम्पत्याने सुरू केलेला वारसा पुढे नेण्याचा हा कार्यक्रम आहे. मुलींना शिक्षण देण्याची पहिली शाळा सुरू करून महिलांना शिक्षणाची कवाडे उघड करून दिली. तो वारसा स्मृतीस्थळातून जपण्याचे भाग्य आम्हाला लाभले. हे स्मारक अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button