शिवसेना ठाकरे गटाला जिल्ह्यातील कोल्हापूरातील पाच विधानसभा मतदारसंघ मिळावेत अशी मागणी
पदाधिकाऱ्यांची पाच विधानसभा मतदारसंघांत पक्षाची ताकद
![Shiv Sena Thackeray, faction, Kolhapur, five, assembly, constituency, demand,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/uddava-780x470.jpg)
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाला जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, चंदगड, राधानगरी, शिरोळ, शाहूवाडी हे पाच विधानसभा मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतील ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
ठाकरे यांनी जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी पाच विधानसभा मतदारसंघांत पक्षाची ताकद आहे, त्यामुळे ते पक्षाला मिळावेत, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पाचवेळा आमदार निवडून आला आहे. हा मतदारसंघ शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा होता. त्यामुळे हा मतदारसंघ मिळालाच पाहिजे, असा आग्रह धरला. राधानगरी मतदारसंघात विद्यमान आमदार हे याच पक्षाचे होते. त्यामुळे या मतदारसंघासह शाहूवाडी, शिरोळ व चंदगड हे मतदारसंघही मिळावेत, अशी मागणी करण्यात आली.
उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर मतदारसंघाची माहिती दिली. जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी चंदगड, राधानगरी, कागल मतदारसंघांतील माहिती दिली. शाहुवाडी, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी मतदारसंघांची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली.
सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, उपशहरप्रमुख कमलाकर जगदाळे, दत्ताजी टिपुगडे, संजय जाधव, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, सुरेश चौगले, संभाजी पाटील, सुर्यकांत भोईटे, प्रभाकर खांडेकर, रियाज समंदी, आदी उपस्थित होते.
त्यामुळे या मतदारसंघासह शाहूवाडी, शिरोळ व चंदगड हे मतदारसंघही मिळावेत, अशी मागणी करण्यात आली. पक्षाचे मशाल चिन्ह हे घरोघरी पोहोचविण्यासाठी मोहीम हाती घ्या, असे आदेश पक्षप्रमुख ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार गुरुवारी (ता. ३) जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी नियोजन सुरू केले आहे.
‘मातोश्री’बाहेर पदाधिकाऱ्यांत वादावादी
बैठकीनंतर कोल्हापूर शहरातील पदाधिकारी बाहेर आले. यावेळी रणनितीकार म्हणून परिचित असलेल्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने दुसऱ्या पदाधिकाऱ्याला ‘तुम्ही इथे कसे?’ अशी विचारणा केली. यावर आपल्याला डिवचण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक विचारणा केल्याचे समज करून या पदाधिकाऱ्याने या प्रमुख पदाधिकाऱ्याला अपशब्द वापरले. यामुळे दोघांत शाब्दिक वाद सुरू झाला. अखेर अन्य पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला. परंतु, या वादाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली