‘लाडकी बहीण योजना महिलांच्या मतांसाठी जुगाड’; भाजप आमदाराचं अजब विधान

मुंबई | महायुती सरकारने सुरु केलेल्या या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची मोठी चर्चा राज्यात सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, असे असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेले एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे’, असं टेकचंद सावरकर यांनी एका सभेत बोलताना म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर टेकचंद सावरकर यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओही शेअर केला आहे. ‘आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली, तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरापुढे मतदानाची पेटी येईल. त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणी कमळाला मत देतील, यासाठी आम्ही हे जुगाड केलंय. हे सर्वजण खोटं बोलले असतील. मात्र, मी खरं बोलतो. माझं बोलणं खरं आहे की नाही? नाहीतर बोलायचं एक आणि करायचं एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का?’ असं आमदार टेकचंद सावरकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी
यानंतर आता आमदार टेकचंद सावरकर यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. एका मेळाव्यातील माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला. माझा असा कोणताही उद्धेश नव्हता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे. मी एकट्याने काही म्हटलं तर काहीही होणार नाही. सुनील केदार यांनी दोन दिवसांपूर्वी या योजनेबाबत बोलताना म्हटलं होतं की, माझं सरकार आलं तर मी पहिलं काम कोणतं करेन तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्याचं काम करेन, असं सुनील केदार म्हणाले होते. आता खरं तर काँग्रेसकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे काँग्रेसने माझ्या भाषणाची तेवढीच क्लिप व्हायरल केली, असं आमदार टेकचंद सावरकर यांनी म्हटलं आहे.





