मी नेहमी महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल याचा विचार करतो आणि त्यासाठी सकाळी ६ वाजता उठून कामाला लागतो- अजित पवार
सोलापुरात “जन सन्मान यात्रा” दाखल: येत्या १५ दिवसांत ४४.६ लाख शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘जन सन्मान यात्रा’ आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा विधानसभा मतदारसंघात पार पडली. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मोहोळचे आमदार यशवंत माने, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हेही उपमुख्यमंत्र्यांसोबत होते. यात्रेची सुरुवात भव्य बाईक रॅलीने झाली ज्यात हजारो तरुण सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणले की, अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळेच यशवंत माने आणि राजन पाटील यांनी या मतदारसंघासाठी ₹3,000 कोटींचा निधी मिळवला आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील यांना योग्य सन्मान मिळावा याची जबाबदारी मी घेतो. आमचा पक्ष शिस्त पाळतो. जो कोणी राजन पाटील आणि यशवंत माने यांना कमी लेखण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्याशी आम्ही खंबीरपणे सामना करू.” आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्या, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

महिलांच्या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले की, 129 कोटींच्या नगर परिषदेच्या प्रलंबित भूमिगत गटार प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. अजित पवार यांनी नागरी परिवर्तनासाठी भूमिगत गटार योजनेचं महत्त्व सांगितलं. आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून ते म्हणाले की, त्यांच्या प्रयत्नांमुळे या मतदारसंघात सुमारे 2750 कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत.
अजित पवार यांनी धर्मनिरपेक्ष तत्त्वांशी बांधिलकीचा पुनरुच्चार केला, ते म्हणाले, “शिवसेनेसोबत काम करत असतानाही शाहू-फुले-आंबेडकरांच्या दूरदृष्टीनुसार आमचे प्रयत्न कायम राहिले आणि भाजप आणि शिवसेना-एकनाथ शिंदे यांच्या युती सरकारमध्येही सुरूच आहेत.” लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने पाठिंबा दिला नसला तरी त्या समाजाकडे दुर्लक्ष केले नाही आणि अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मार्टी सारखी संस्था आणली असल्याचं अजित पवारांनी यावेळेस सांगितलं आहे.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास माझी लाडकी बहीण योजना, अन्नपुर्णा योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज या सर्व योजना पुढील ५ वर्षे सुरूच राहतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पर्यटन क्षेत्राबद्दल बोलताना ते म्हणाले की, सोलापूर आणि उजनीला पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित करण्यासाठी 250 कोटी रुपयांचा उजनी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
आजचा दौरा रद्द केल्याच्या दाव्याला उत्तर देताना ते म्हणाले, “माझा दोरा रद्द करू शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही” आरक्षणाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर पवार म्हणाले, “आम्ही तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.”
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी जन सन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांशी जोडण्यासाठी महत्वाची ठरत आहे. 08 ऑगस्टपासून सुरू झालेल्या यात्रेमुळे अजित पवार गटात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याकडून चुका झाल्या तरी त्या सुधारण्याची आमची तयारी आहे, हे मान्य करून अजित पवार यांनी जनतेला सतत पाठिंबा देण्याचे आवाहन केले.





