कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच ‘आई तुळजा भवानी’ मालिका
मालिका ऑन एअर जाण्यापूर्वीच अभिनेत्रीला दुखापत
![Colors, Marathi, Vahini, 'Ai Tulja Bhavani', Serial, On, Air, Actress, Injury,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/tuljabhavani-1-780x470.jpg)
मुंबई : कलर्स मराठी वाहिनी सध्या सुरू असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी ५’ मुळे विशेष चर्चेत आहे. या दरम्यान वाहिनीवर काही नव्या मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, तर आगामी काळातही आणखी शो सुरू होणार आहेत. यापैकी ‘आई तुळजा भवानी’ ही मालिका पहिल्या प्रोमोपासून चर्चेत आली. ही मालिका कधीपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार, याची तारीख जाहीर झाली नसली तरी मुख्य भूमिकेत कोण असणार हे अलीकडेच आलेल्या प्रोमोमधून स्पष्ट झाले. अभिनेत्री पूजा काळे या मालिकेत आई तुळजा भवानीच्या भूमिकेत असून तिच्याविषयी एक काळजीत टाकणारे वृत्त समोर आले आहे.
या पौराणिक मालिकेचे विविध प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून सध्या ‘आई तुळजा भवानी’ मालिकेची टीम कोल्हापूरमध्ये शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या शूटिंग सेटवर अघटित घडले आणि पूजाला दुखापत झाल्याचे समोर आले. काही दृश्य चित्रित करत असताना पूजा जखमी झाली.
सूत्रांनी अशी माहिती दिली की, “एका सीक्वेन्सदरम्यान पूजाचा हात निखळला. आवश्यकतेनुसार अभिनेत्रीवर तत्काळ उपचार करण्यात आले आणि सुदैवाने डॉक्टरांनी काहीही गंभीर नसल्याचे सांगितले, मात्र तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” त्यांनी असेही नमूद केले की, दुखापत असूनही पूजाने काम सुरू ठेवले आणि तिने यशस्वी प्रयत्न करुन सीन पूर्ण केले आहेत. सध्या भविष्यात इजा होऊ नये याकरता तिला टीमने तिला ब्रेक घेण्यास सांगितले असून घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान ईटाइम्सने असेही नमूद केले आहे, त्यांनी पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ती कोणत्याही कमेंटसाठी उपलब्ध नव्हती.
अधर्माचा विनाश आणि भक्तांच्या रक्षणासाठी, धरतीवर अवतरलेल्या अष्टभुजा आई तुळजाभवानीची कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. मालिका कधी प्रसारित होणार याविषयी अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. याशिवाय पूजासह या मालिकेत इतर कोणते कलाकार असतील, याविषयीदेखील कोणताही तपशील वाहिनीकडून देण्यात आलेला नाही.