‘..तर मोदी सरकार कोसळेल’; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर केंद्रातील नरेंद्र मोदींचं सरकार देखील पडेल, असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. केंद्रातील मोदींचं सरकार हे नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पर्टीच्या पाठिंब्यावर उभं आहे. नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू भाजपाला सोडून जातील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तुम्ही (महाराष्ट्रातील जनता) महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलंत तर दिल्लीतलं मोदींचं सरकार फार दिवस टिकणार नाही. हरियाणा राज्यात सत्तांतर होत आहे. त्यामुळे आता केंद्रातील मोदींची खुर्ची डळमळीत झाली आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र व हरियाणातील सत्तांतर पाहून चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे मोदींना सोडून जातील. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार १३ महिन्यांमध्ये कोसळलं होतं. भारतात लवकरच त्याची पुनरावृत्ती होताना तुम्हाला दिसेल.
हेही वाचा – मोफत आधारकार्ड अपडेट करण्याची आज शेवटची तारीख, घरबसल्या असे करा अपडेट!
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण, बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील बलात्काराची घटना व राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे जनतेच्या मनात सरकारविषयी प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. भाजपाला निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.





