ताज्या घडामोडीविदर्भ

आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सकल आदिवासी समाजातर्फे मोर्चा

पावसामुळे विद्यार्थ्यांसह वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले

नाशिक : पेसाअंतर्गत नोकर भरतीसह आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सकल आदिवासी समाजातर्फे बुधवारी (ता. २८) मोर्चा काढण्यात आला. परंतु या मोर्चामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. मोर्चा आणि पावसामुळे विद्यार्थ्यांसह वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

सकल आदिवासी समाजातर्फे बुधवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता तपोवनातून मोर्चा निघणार होता. परंतु पहाटेपासूनच पावसाची संततधारेमुळे मोर्चा दुपारी साडेबारा एक वाजेच्या सुमारास आदिवासी विकास भवनच्या दिशेने निघाला. मोर्चामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागातर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले होते. परंतु मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्याने निघाल्याने शहरातील उपनगरीय मार्गांवर जागोजागी वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली होती.

द्वारका सर्कल जाम

आदिवासी मोर्चा तपोवनातून छत्रपती संभाजीनगर रोडने पंचवटी, निमाणीच्या दिशेने निघाला. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गाच्या सर्व्हिसरोडवरील वाहतूक ठप्प झाली. मोर्चा पुढे निघाल्यानंतर वाहतूक सुरळीत केल्याने पुढे कन्नमवार पुलापासून ते द्वारका सर्कलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे द्वारका सर्कल सिग्नल यंत्रणाही कोलमडून पडली. पोलिसांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी दमछाक झाली.

विद्यार्थी अडकले

मोर्चा दुपारी तीनच्या सुमारास एमजी रोडवर पोहोचला. त्यामुळे गडकरी सिग्नल ते मेहेर सिग्नल या दुतर्फा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली. मोर्चेकरूंनी सीबीएस चौकात १५ ते २० मिनिटे ठाण मांडले. त्यामुळे शरणपूर रोडकडे व येणारी या मार्गांवरील वाहने अडकून पडली.

तर याच परिसरात शाळा आहेत. बसथांबेही आहेत. येथूनच विद्यार्थी बसेसने जातात. परंतु गडकरी चौक, त्र्यंबक नाका याठिकाणी मोर्चेकरू बसल्याने वाहतूक ठप्प होती. त्यामुळे सीबीएस, मेहेर सिग्नलवर बसच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोर्चा संपल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. परंतु रस्त्यावरील गर्दीने वाहतूक संथगतीने होती.

जनजीवन विस्कळीत

स्मार्ट रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, मध्यवर्ती बसस्थानक असल्याने दररोज हजारो नागरिक याठिकाणी येतात. दुपारनंतर सदरील रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने या नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तीन महिन्यांपूर्वीही आदिवासी आंदोलकांनी आठवडाभर स्मार्ट रोडवर ठाण मांडत आंदोलन केले होते.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली चार सहायक आयुक्त, पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली, आडगाव, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह २५ पोलीस निरीक्षक, ३५ सहायक व उपनिरीक्षकांसह ५०० पोलीस अंमलदार व ३०० होमगार्ड यांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. तसेच, चौकांमध्ये बॅरिकेटींग करून वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळविली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button