TO THE POINT । महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी ‘खिचडी’; भोसरीत इच्छुकांची ‘ऑलिम्पिक रेस’
विधानसभा निवडणुकीसाठी सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्यासह गव्हाणे, लांडगेसुद्धा शर्यतीत
माजी आमदार विलास लांडेसुद्धा म्हणतात ‘‘… अजून मी काय म्हातारा झालेलो नाही!’’
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
राज्यात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी द्विपक्षीयांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने घमासान सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करीत असून, मविआच्या तिकीटासाठी इच्छुकांनी अक्षरश: ‘देव पाण्यात ठेवले आहेत’ त्यामुळे उमेदवारांची खिचडी अन् इच्छुकांची ऑलिम्पिक रेस… अशी स्थिती पहायला मिळत आहे.
भारतीय जनता पार्टी किंबहुना महायुतीचा ‘बालेकिल्ला’ असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मविआमध्ये ‘इनकमिंग’ आणि महायुतीमधून ‘आउटगोईंग’ वाढले आहे. याबाबत भोसरी मतदार संघ सर्वाधिक चर्चेत आहे.
शहरातील तीनपैकी तीनही मतदार संघामध्ये महायुतीचे आमदार आहेत. विशेष म्हणजे, भाजपाने शहरातील दोन नेत्यांना विधान परिषदेवर संधी दिल्यामुळे भाजपाच्या शहरातील आमदारांची संख्या ४ वर आहे. त्यामुळे भाजपाला धडक देण्यासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.
काही दिवसांपूर्वी, महायुतीमधील घटकपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गव्हाणे आणि सहकाऱ्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि विधानसभेकरिता ‘तुतारी’ हाता घेत दंड थोपाटले आहेत. त्यांचा प्रचार शिगेला पोहोचला होता.
‘‘भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना गव्हाणे आव्हान देतील.. किंबहुना त्यांच्याकडेच ती क्षमता आहे’’, अशी वातवरण निर्मिती शहरातील काही ज्येष्ठ पत्रपंडितांकडून सुरू होती तोच माजी नगरसेवक रवि लांडगे शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेशकर्ते झाले. मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करीत विधानसभा निवडणूक ‘मशाल’ चिन्हावर लढण्याची घोषणा करुन टाकली. यावर ‘वादळ… वारे… लोहा… हातोडा’ अशी पुष्टी देत लांडगे विरुद्ध लांडगे अशी लढत होईल, असेही काही राजकीय जाणकारांनी निरीक्षण नोंदवली. किंबहुना, ‘महाविकास आघाडीचा शहरातील पहिला उमेदवार ठरला’ असाही दावा करण्यात आला. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट हेसुद्धा निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक आहेत.‘‘ निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळेल…’’ अशी त्यांची अपेक्षा आहे.
विरोधक- नाराजांची मोट बांधण्याची क्षमता विलास लांडे यांच्याकडेच…!
‘‘कोणी भगवा फडकवणार.. कोणी तुतारी वाजवणार…’’ असा ‘पॉलिटिकल धुरळा’ सुरू असतानाच रवि लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ठचिंतन कार्यक्रमात माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. ‘‘अजित आणि रवि यांनी एकत्रित बसून निवडणूक कोणी लढवावी याचा निर्णय घ्यावा. दोघेही चांगले काम करीत आहेत. त्यामुळे मी जरा सबुरीने घेतले. पण, मी काही अजून म्हातारा झालेलो नाही..’’ असा ‘समझने वालों को इशारा काफी हैं’ असे संकेत दिले. वास्तविक, विलास लांडे हे महायुतीसोबत असल्याचे भासवत असले तरी, त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण यंत्रणा महाविकास आघाडीचे काम करीत आहे. अजित गव्हाणे, रवि लांडगे, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्या चढाओढीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व इच्छुक आणि महायुतीमधील नाराजांची मोट बांधण्याची क्षमता विलास लांडे यांच्याकडे आहे. अन्यथा आमदार महेश लांडगे यांच्यासमोर अन्य कुणाचा निभाव लागण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे विलास लांडे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर मैदानात उतरतील. त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातील लांडे यांचे ‘परममित्र’ शिष्ठाई करतील, असे निरीक्षणही राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.