मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश
Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यामुळे मनोज जरांगेंविरोधात सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार? असा प्रश्न उपस्थित केला.
महाराष्ट्र बेचिराख करायची भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील, असा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का? यामागची भूमिका काय? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? याबाबत गांभर्याने विचार करावा लागेल. कारण, आता मराठा समाजाचीही बदनामी होतेय, असं आशिष शेलार म्हणाले.
हेही वाचा – ‘मराठी राजभाषा दिन’ अन् ‘मराठी भाषा गौरव दिन’ मध्ये फरक काय?
महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू, असं म्हटलं जातंय. हा कटकारस्थानाचा भाग आहे. या विषयाची गंभीर नोंद घेतली पाहिजे. आज या व्यक्तीला महत्त्व द्यायचं नाही. समाज आमच्याबरोबर आहे. हे सगळं घडवणारे मनोज जरांगे राहतात कुठे हे शोधलं पाहिजे. तो कारखाना कोणाचा आहे हे शोधलं पाहिजे. तिथे आलेली दगडं कोणाच्या कारखान्यातील आहेत हे शोधलं पाहिजे. या आंदोलनाला जेसीबी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले. या सगळ्यामागे एका व्यक्तीच्या समर्थनाची, पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, एका कारखान्याच्या मालकाची असेल तर एसआयटी लावा, अशी मागणी आशिष शेलारांनी यावेळी केली.
आशिष शेलारांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षानेही भूमिका मांडली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. सभागृहात गोंधळ वाढू लागल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केलं. कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली.