‘भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरूंगापेक्षा भाजप बरा’; संजय राऊतांचा खोचक टोला
![Sanjay Raut said that one slogan of corruption, BJP is better than jail](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sanjay-Raut-4-780x470.jpg)
मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला राम राम केला. चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरूंगापेक्षा भाजप बरा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात मुंबईमध्ये या देशातला सर्वात मोठा आदर्श बिल्डिंगचा घोटाळा झाला. बिल्डिंग चार मळ्याची बांधायची होती. सैनिक हुतात्मे यांच्यासाठी ती इमारत बांधायची होती. पण अशोक चव्हाणांनी ३४ माळे चढवले. भारतीय जनता पक्ष अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकायला निघाला होता. आज त्याच भारतीय जनता पक्षानं अशोक चव्हाण यांना त्यांच्या पक्षात घेतलं.
हेही वाचा – वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभांमधून अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेची ऑडिओ क्लिप सगळ्यांना ऐकवली. दोन-तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहेत हे नांदेडमध्ये येऊन सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्यावर टीका केली होती. ‘अशोक चव्हाण नांदेडमध्ये विकास करू शकले नाहीत. कारण ते लीडर नव्हे, डीलर आहेत. नांदेडला लीडरची गरज आहे. लीडर म्हणून प्रतापपाटील चिखलीकर यांची गरज आहे’, असं ते म्हणाले होते. सिंचन घोटाळ्याविषयी मोदी बोलतात आणि २४ तासांत अजित पवार भाजपासोबत जातात. भाजपाला विस्मरणाचा रोग झालाय. आधी काय बोललो होतो, काय केलं होतं, कुणाला भ्रष्टाचारी म्हणालो होतो हे त्यांना आठवत नाही, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
हल्ली घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं असं चाललंय. एक नवीन नारा आलेला आहे. भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा. आज हा नारा अशोक चव्हाण यांनी दिलेला आहे. भाजपानं आमच्याकडचे ४० घेतले, अजित पवारांसोबत ४० घेतले आणि आता काँग्रेसचे ५-१० घेतील. हा भारतीय जनता पक्ष आहे. मला तर असं वाटतंय की आता संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयात भरतील. महाराष्ट्रात भ्रष्टाचार, गुंडगिरी, चोऱ्या करणाऱ्यांचं राज्य आलंय, असंही संजय राऊत म्हणाले.