पुण्यात एनआयएची मोठी कारवाई; कोंडवा परिसरातील नुरानी मस्जिद जवळून एकजण ताब्यात
पुणे :
धार्मिक प्रचाराच्या नावाखाली देश विघातक कृत्य करून सामान्य माणसांची दिशाभूल करणाऱ्या पुण्यातील एका तरुणास सोमवारी (दि.३) सकाळी कोंडवा परिसरातील नुरानी मस्जिद जवळून एनआयएने ताब्यात घेतले. हा तरुण इसिस या संघटनेशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणेला असून अनेक दिवसांपासून त्याच्या हालचालींवर लक्ष होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांनी एकत्रपणे आज राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी करत काही जणांना ताब्यात घेतले.
त्यातीलच एक भाग म्हणून पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या नुरानी जवळ एक तरुण धार्मिक प्रचाराच्या नावाखाली दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचे तपास यंत्रणा कळाले. आधीपासूनच तपास यंत्रणेच्या रडारवर असलेला जुबेर नामक तरुण अखेर आज अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. काही दिवसांपूर्वी मुंबईतील नागपाडा येथील तरुणास दहशतवादी कारवायाच्या संशयांवरून ताब्यात घेण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने संयुक्तपणे कारवाई करत मुंबईत काही ठिकाणी तर अन्य एका पथकाने पुण्यातील कोंढवा परिसरात सोमवारी (दि.३) सकाळी छापेमारी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संयुक्त कारवाईत कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीमध्ये एनआयए-आयबी यांच्या पथकाने सकाळीच छापे मारले. तपास यंत्रणेला जो तरुण हवा होता तो त्याठिकाणी मिळून आला नाही. जुबेर नामक तरुणाच्या शोधासाठी पथकातील काही अधिकाऱ्यांनी तो जात असलेल्या मस्जिद जवळ जात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांनी दुसरीकडे शोधाशोध केली असता एक तरुण नुरानी मस्जिद जवळ काही लोकांना धार्मिक प्रचाराच्या नावाखाली भलतेच काही सांगत असल्याचे कळाले.