मुलांना धक्काबुक्की, पुस्तके मारणे हेही गंभीर, प्ले स्कूलमधील शिक्षकांच्या गैरवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयाचे कठोर निर्देश
![Punishment of children, hitting books, serious, abuse of teachers in play schools, Bombay High Court, strict instructions,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Teacher-H-C-780x470.png)
मुंबई : प्ले स्कूलमधील लहान मुलांशी शिक्षकांच्या हिंसक वर्तनावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लहान मुलांना क्रूर वागणूक दिल्याने त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या डोक्यावर पुस्तक मारून त्यांना चिमटे मारल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाला अटकेतून दिलासा देता येणार नाही. कांदिवलीतील एका प्ले स्कूलच्या शिक्षिका भक्ती शहा यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली. न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.
कांदिवली पोलिसांनी शिक्षिका भक्ती शाह विरुद्ध बाल न्याय कायदा 2015 आणि 2020 च्या कलम 23 आणि 75 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. अटकेची भीती पाहून शहा यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली.
cctv फुटेज महत्वाचे पुरावे
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज प्रथमदर्शनी या प्रकरणात आरोपी शिक्षकाचा सहभाग असल्याचे स्पष्ट करते. ती मुलांसोबत वाईट आणि क्रूरपणे वागताना दिसत आहे. त्यामुळे गुन्हा अधिक गंभीर होतो. निष्पाप मुलांसोबत अशाप्रकारच्या गैरवर्तनामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.