‘राज्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा’; जयंत पाटलांचं सूचक विधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार, हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं होतं. यावर जयंत पाटील म्हणाले की, जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमतानं चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी ते वक्तव्य प्रतीक पाटील आणि माझ्या कौतुकासाठी केलं होतं, असं जयंत पाटील म्हणाले.





