पोलीस आयुक्तालयाच्या फर्निचरसाठी महिनाभरानंतर लागला मुहूर्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/3Commissionerate_Place.jpg)
पावणे चार कोटीची स्थापत्य व फर्निचर विषयक कामांना स्थायीची मान्यता
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेने चिंचवडच्या प्रेमलोक पार्कमधील महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या इमारतीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी जागा देण्यात आली. त्या शाळेच्या इमारतीत स्थापत्य विषयक व फर्निचरची कामे करण्यासाठी तब्बल एका महिन्यानंतर पालिकेला मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे स्थापत्य आणि फर्निचर विषयक कामांसाठी सुमारे पावणे चार कोटी रुपयास आज ( मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे तात्पुरत्या स्वरुपात 15 आॅगस्टला चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये सुरु करण्यात आले. तेथून शहरातील कामकाजास प्रारंभ करण्यात आला तरी पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेने प्रतिमहा 4 लाख 80 हजार रुपये प्रमाणे भाडे आकारणी करुन महात्मा फुले शाळेची इमारती दिली आहे. त्या इमारतीत स्थापत्य विषयक अनेक कामे आणि फर्निचर उपलब्ध नव्हते. त्यामुळे महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून चार महिन्यात कामे करण्याची मुदत ठेकेदाराला दिले आहे.
यामध्ये पोलीस आयुक्तालय इमारतीत विविध ठिकाणी स्थापत्य विषयक व फर्निचरची कामे करणे, याकरिता मे. सोपान जर्नादनराव घोडके या ठेकेदारांची निविदा रकमेच्या तीन कोटी 87 लाख 62 हजार 189 मधून राॅयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून तीन कोटी 86 लाख 50 हजार 150 रुपये पेक्षा 10.50 टक्के कमी या दराने निविदा आलेली आहे. तसेच तुलनात्मक दृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार चार महिने मुदतीत काम पुर्ण करण्यास सक्षम असल्याने त्याला अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता दिली.
दरम्यान, संबंधित ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने राॅयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेसह रक्कम तीन कोटी 47 लाख 3 हजार 923 पर्यंत काम करुन घेण्यास मान्यता दिलेली आहे.