पोटनिवडणूक निकाल : भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्या विजय निश्चित; २७ व्या फेरीअखेर तब्बल २१ हजार ४७ मतांची आघाडी!
पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी दमदार विजय मिळवणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आतापर्यंत ३७ पैकी २७ फेऱ्यांची मतमोजणी झाली असून, यामध्ये तब्बल २१ हजार ४७ मतांची आघाडी जगताप यांनी घेतली आहे.अद्याप १० फेऱ्या बाकी आहेत.
चिंचवड व कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपाला कडवी झुंज दिली. यात कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का दिला. तर चिंचवड मतदारसंघात भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी सुरूवातीपासून आपली आघाडी कायम ठेवली. नाना काटे यांच्या प्रभागात काहीसे मताधिक्य कमी झाले. मात्र, पुन्हा जगताप यांनी आघाडी घेत विजयश्री खेचून आणण्याची घोडदौड पुन्हा सुरू केली.
२७ व्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांनी एकूण १ लाख १ हजार ९४९ मिळवली आहेत. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी ८० हजार ९०२ मते, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी ३० हजार ९३ मते मिळवली आहेत.