बैलगाडीवर दुचाकी ठेवून राष्ट्रवादीचे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/1.jpg)
पुणे – सातत्याने होणारी इंधन दरवाढ थांबवावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले. सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय ते स्वारगेट चौकातील पेट्रोलपंप या दरम्यान बैलगाडीवर दुचाकी ठेऊन अभिनव पद्धतीने रॅली काढण्यात आली.
शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आणि खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी करण्यात आलेल्या या आंदोलनात महागाई झालीय फार, अछे दिन कब आयेंगे यार.., गरिबांची चेष्टा बंद करा.., पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा.., या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय.., मोदी सरकार हाय-हाय.., पेट्रोल-डिझेल दरवाढ करणार्या सरकारचा, धिक्कार असो.., अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पेट्रोल पंपावर नागरिकांना काळ्या कमळाची प्रतिकृती देऊन दरवाढीचा आणि भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
आंदोलनात नगरसेवक विशाल तांबे, नगरसेविका नंदा लोणकर, स्मिता कोंढरे, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष राकेश कामठे, सामाजिक न्यायप्रमुख पंडित कांबळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष मनाली भिलारे, माजी आमदार कमल ढोले पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, आप्पा रेणुसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.