जि.प. भरती प्रक्रिया रखडलेलीच; तीन वर्षांपासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांकडून संताप
![G.P. Recruitment process stalled; Anger from candidates who have been waiting for three years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/exam-1-1.gif)
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई : जिल्हा परिषदांतील १३ हजार ५२१ रिक्त पदांची २०१९मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया २०२२मध्येही रखडलेलीच आहे. तीन वर्षांपूर्वी याकरीता घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी २० लाख उमेदवारांनी पाच ते सात हजार रुपये अर्जापोटी भरले. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील उमेदवार परीक्षा होण्याची वाट पाहत आहेत. असे असताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भरती प्रक्रियाच रद्द केली असल्याबाबतची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांतून फिरू लागल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांना केवळ सत्ता दिसते, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते, पण नोकरीसाठी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार दिसत नाहीत का, जिल्हा परिषद भरती सातत्याने का पुढे ढकलली जाते, असा संताप उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.
सामान्य प्रशासन विभागाने २६ ऑगस्ट रोजी शासन निर्णयाद्वारे कालबद्ध पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचे वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात खासगी कंपनीची निवड करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आणि निकाल, नियुक्ती प्रक्रिया राबवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. या वेळापत्रकामुळे परीक्षा होण्याची आशा उमेदवारांमध्ये निर्माण झाली. मात्र काही दिवसांपूर्वी त्या वेळापत्रकालाही स्थगिती देण्यात आली. आता भरती प्रक्रिया कधी होणार याबाबत काहीही स्पष्टता नाही. कधी अर्जदारांची माहिती गोळा करणे, कधी अन्य परीक्षांचे कारण देत आतापर्यंत तीन वेळा ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यातच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि स्पर्धा परीक्षार्थी यांच्यातील जिल्हा परिषद भरतीबाबतच्या दूरध्वनी संवादाची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांत फिरू लागल्याने उमेदवार अधिकच संतप्त झाले आहेत.