Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

करवळी माशाचा अंगावर केशरी पट्टा आला म्हणजे आता पावसाळा सुरू झाला; विदर्भात यंदा खरा ठरला अंदाज

नागपूर : करवळी माशाचा अंगावर केशरी पट्टा आला म्हणजे आता पावसाळा सुरू झाला आणि येथून पुढे चांगला, अविरत पाऊस पडणार, अशी धारणा पूर्व विदर्भातील मासेमारांमध्ये आहे. यंदाच्या वर्षी ही धारणा खरी ठरत असल्याचे दिसून आले आहे. करवळीच्या अंगावर हा केशरी पट्टा दिसू लागल्यापासून मागील आठवड्याभरात सातत्याने दमदार पाऊस नोंदविला गेला आहे.

मान्सूनच्या पावसावर भारतीय शेती आणि जीवन अवलंबून असल्याने त्याबद्दल नागरिकांमध्ये अनेक प्रकारची निरीक्षणे आणि त्यातून आलेले परंपरागत ज्ञान आहे. पूर्व विदर्भातही करवळी माशाच्या संदर्भात ही धारणा मासेमारांमध्ये टिकून आहे. करवळी या लहान आकाराच्या माश्याच्या अंगावर केशरी रंगाचा पट्टा दिसू लागला की सतत पाऊस येणार, असे समजले जाते. तलावांमध्ये आढळणाऱ्या या माशाबद्दलच्या निरीक्षणाचा संबंध शेतीशी आहे. असा पट्टा दिसायला लागल्यावर मासेमार आपल्या शेतीत रोवणीला सुरुवात करतात. या माशातील हा बदल म्हणजे चांगल्या पावसाची हमी आणि त्यानंतर त्यांच्या पिलांसाठी अन्नाची मुबलकता असणे याचे निदर्शक समजले जाते. नर करवळी माशातील हा रंगबदल विणीच्या हंगामात होतो आणि त्याला स्थानिक प्रथेनुसार ‘करवळी शिंगारली’ असे म्हटले जाते. सध्या पूर्व विदर्भातील तलावांमध्ये असे मासे मागील दहा दिवसांपासून दिसणे सुरू झाले आहे. त्यानंतर, गेल्या काही दिवसांत सातत्याने पाऊस पडत असल्याचाही अनुभव येतो आहे.

विणीचा हा हंगाम वगळता हा मासा पूर्णपणे पांढरा असतो. पूर्व विदर्भासह मध्य भारतातील अनेक तलावांमध्ये तो आढळतो. ‘पंटिअस सोफोर’ असे शास्त्रीय नाव असलेल्या करवळीच्या चार विविध चार प्रजाती असून त्यातल्या एकाच प्रजातीत हा बदल घडून येतो. अंगावरील काळ्या ठिपक्याच्या वेगवेगळ्या ठिकाणानुसार या प्रजातींमधील वैविध्य ओळखले जाते.

‘पूर्व विदर्भात मासेमार या माशातील बदलाची वाट बघत असतात. ढिवर किंवा मासेमार लोकांमधील हे परंपरागत ज्ञान आहे. मागील काही वर्षांमध्ये हा अंदाज बरोबरच आल्याचे बघितले आहे. या निरीक्षणाची नोंद पब्लिक बायोडायर्व्हसिटी रजिस्टरमध्ये होणे गरजेचे आहे. असे अधिकृतरीत्या नोंदविले गेल्यास परंपरागत निरीक्षणातून आलेले ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत नेता येईल. अन्यथा ते नष्ट होण्याचा धोका आहे’, असे मत जल आणि जैवविविधतातज्ज्ञ मनीष राजनकर यांनी व्यक्त केले.

वागूरच्या घरट्याचे शोधा स्थान!

प्राणी आणि पक्षी यांच्या घरट्यांच्या ठिकाणांवरूनही पाऊस कसा पडेल, यांचे अंदाज पिढ्यानपिढ्या बांधण्यात येत आहेत. वागूर हा मासा पाण्याबाहेर बशीच्या आकाराचे गोल घरटे बांधतो. त्यात पाणी साचते व तेथे हा मासा अंडी देतो. नर आणि मादी दोघेही घरट्याचे रक्षण करतात. या माशाने पाण्याजवळ अंडी दिसल्यास पाऊस फारसा पडणार नाही, असे मानले जाते. याउलट पाण्यापासून जास्त अंतरावर घरटे बांधल्यास पावसाचे प्रमाण जास्त राहील, असा अंदाज व्यक्त केला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button