breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रलेख

विशेष लेख : होऊ द्या बैलगाडा शर्यती! पण जबाबदारीचे भान हवे!

बैलगाडा शर्यतीतील बैलगाड्याच्या चाकाचा आणि ग्रामीण अर्थचक्राचा खूप जवळचा संबंध आहे, गेली अनेक वर्ष बैलगाडा शर्यत बंदी मुळे हे चाक धावायचे थांबले होते म्हणून ग्रामीण अर्थचक्राची गती कमी झाली होती.बैलगाडा शर्यतीची राज्याला सुमारे 400 वर्षांपूर्वीची परंपरा आहे.पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यती कडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देसी गाय-बैलांचे संगोपन व जतन संवर्धन चांगल्या प्रकारे केले जाते. बैलांचे संगोपन शेतकरी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने करत असतो.बैलांच्या प्रदर्शन व शर्यतीवरील बंदी मुळे बैलांच्या जाती नामशेष होण्याची भीती निर्माण झाली होती. शर्यत बंदी मुळे देशी गाय बैलांचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला होता तसेच शर्यत बंदी मुळे शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत होती .ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते.

अनेक वर्ष ग्रामीण भागात शर्यती सुव्यवस्थितपणे चालू असताना प्राण्यांच्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या काही संस्था व व्यक्तींनी साधारणपणे 2004 पासून बैलगाडा शर्यती बाबत आक्षेप घ्यायला सुरुवात केली .हे शहरी लोक शर्यतीच्या ठिकाणी येऊन शर्यतींना विरोध करू लागले परंतु शर्यतीच्या ठिकाणी ग्रामीण भागातील शर्यत प्रेमिंची संख्या जास्त असल्याने या शर्यत विरोधकांचे तेथे काहीच चालले नाही. त्यानंतर या शर्यत विरोधकांनी शर्यतीच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्धार केला त्यांनी 2011 मध्ये तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचेशी संपर्क ठेऊन बैल या पाळीव प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीत समावेश करून घेतला, भारत सरकारच्या प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 कलम 22( 2) नुसार देशातील प्राण्यांच्या संदर्भात अन्याय अत्याचार होत असतील तर अशा प्राण्यांना कायद्यातील वरील कलमान्वये संरक्षित करण्याचा अधिकार केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाला आहे. या संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये समावेश केल्यानंतर संबंधित प्राण्यांचे मनोरंजनाचे खेळ किंवा मनोरंजनासाठी त्या प्राण्यांचा उपयोग करता येत नाही उदाहरणार्थ सर्कस, शर्यत, गावातील नंदीबैल वगैरे. माकड अस्वल वाघ चित्ता सिंह हे संरक्षित यादीतील प्राणी होते 11 जुलै 2011 रोजी बैलाचा समावेश केल्यानंतर या संरक्षित प्राण्यांची संख्या 6 झाली. तत्कालीन केंद्र सरकारने हे नोटीफिकेशन सर्व राज्यांना पाठवले व अंमलबजावणी करण्यास सांगितले त्यानुसार तत्कालीन महाराष्ट्र शासनाने 24 ऑगस्ट 2011 रोजी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात ही केस काही दिवस चालल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी बैलगाडा शर्यती चा लढा माननीय सर्वोच्च न्यायालयात चालू झाला . महाराष्ट्र सोबतच तामिळनाडू कर्नाटक पंजाब या राज्यातील केसेस सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यामुळे याबाबत सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने 7 मे 2014 रोजी संपूर्ण देशात बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने याबाबत जनजागृती करून प्रसंगी राज्यातील बैलगाडा मालकांना एकत्र करून लढा उभारत, बैलगाडा शर्यतीचा तिढा सोडवण्यासाठी सामाजिक, राजकीय ,प्रशासकीय व न्यायालय स्तरावर पाठपुरावा करत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच 7 जानेवारी 2016 रोजी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गॅझेटमध्ये सुधारणा करून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली परंतु या निर्णयास शर्यत विरोधकांकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले… सर्वोच्च न्यायालयात जवळपास एक वर्षभर याबाबत सुनावणी चालली परंतु शर्यत बंदी चा तिढा काही सुटला नाही म्हणून तामिळनाडू येथील जल्लीकट्टू या खेळासाठी तेथील शेतकऱ्यांनी जानेवारी 2017 मध्ये मोठे जनआंदोलन उभारले, यावेळी बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात अशीच मोठी आंदोलने कर्नाटक व महाराष्ट्र मध्ये झाली.. तामिळनाडू सरकारने जल्लीकट्टू स्पर्धा चालू करण्यासंदर्भात विधानसभेत कायदा केला त्याच आधारे कर्नाटक सरकारनेही म्हसींच्या कंबाला रेससाठी तसेच बैलांच्या शर्यती साठी विधानसभेत कायदा केला. भोसरी चे आमदार महेश दादा लांडगे यांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या शिष्टमंडळास सोबत घेऊन शर्यती चालू करण्यासंदर्भात मंत्रालयावर बैलासहित मोर्चा काढून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात कायदा करावा अशी मागणी केली. यातूनच तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एप्रिल 2017 मध्ये बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात विधानसभेत कायदा पास केला, परंतु या कायद्यास सुद्धा काही शर्यत विरोधकांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. बैलगाडा शर्यती चा कायदा न्यायप्रविष्ट झाल्याने तत्कालीन राज्य शासनाने डिसेंबर 2017 मध्ये “बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत” तज्ञांची समिती नेमली या समितीने पुढे काही महिने अभ्यास करून हा अहवाल माननीय सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मुंबई उच्च न्यायालयातून हा विषय सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने सीनियर कौन्सिल ॲड श्री मुकुल रोहतगी ,ॲड शेखर नाफडे , भारतातील या दिग्गज वकिलांची नेमणूक केली. सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यती संदर्भात देशातील सर्व केसेस एकत्र करून पाच न्यायाधीशांच्या विस्तारित खंडपीठासमोर सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु न्यायालयातील प्रलंबित अनेक विषय व कोरोना काळ यामुळे जवळपास चार वर्ष हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित राहिला,राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने आंदोलने चालू केली ,आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे येथे केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले , राज्य शासनाने याबाबत तात्काळ दखल घेत ऑक्टोबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला शर्यतीचे केस बाबत तात्काळ सुनावणी घेण्याबाबत विनंती अर्ज केला, गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील, पशुसंवर्धन मंत्री श्री सुनिल केदार यांनी या बाबत आग्रही भूमिका घेतली. इतर राज्यात शर्यती चालू आहेत म्हणून अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रात शर्यतींना परवानगी द्यावी असा युक्तिवाद ॲड मुकुल रोहतगी ,ॲड सचिन पाटील यांनी केला यातूनच 16 डिसेंबर 2021 रोजी “एक देश एक शर्यत”या न्यायाने न्यायमूर्ती खानविलकर यांच्या बेंच ने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना काही अटीवर परवानगी दिली..याबाबत तसेच इतर राज्यातील केस बाबत अंतिम सुनावणी विस्तारित खंडपीठासमोर पुढील काळात होणार आहे.
वरील प्रमाणे बैलगाडा शर्यती चा चालू – बंदीचा लढा , जुलै 2011 पासून डिसेंबर 2021 पर्यंत जवळपास अकरा वर्ष प्रशासकीय व न्यायालय स्तरावर चालला. या काळात अनेक वेळा शासनाने तसेच न्यायालयाने शर्यतीवर घातलेली बंदी व उठवलेली बंदी याबाबतीतले अनेक आदेश अनेक कोर्ट ऑर्डर यामुळे हा विषय खूप गुंतागुंतीचा झालेला होता, तसेच 2014 मध्ये मा सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर बंदी घालून पुन्हा 2021 मध्ये बैलगाडा शर्यतीवरील उठवली , एखाद्या विषयावर बंदी घालून पुन्हा ती सर्वोच्च न्यायालयाने उठवली ,देशातील काही दुर्मिळ निर्णयापैकी हा निर्णय असावा, की सर्वोच्च न्यायालयाने ज्या मध्ये फेरविचार करून पुन्हा सकारात्मक दिलासा दिला.. म्हणून हा शर्यत बंदी चा लढा देशाच्या इतिहासात संस्मरणीय ठरला, अखिल भारतीय बैलगाडा संघटने सोबतच सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनातील सह्रदयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच तज्ञ वकिलांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे, म्हणूनच शासनाने व न्यायालयाने बैलगाडा शर्यती बाबत घालून दिलेल्या नियमाचे पालन करून शर्यतीतील जुन्या काही अनिष्ट प्रथा बंद करणे यामध्ये अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही प्रत्येक बैलगाडा मालक शेतकऱ्याची जबाबदारी आहे, तरच हा कायदा भविष्यात टिकणार आहे.
बैलगाडा शर्यती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :
ग्रामीण भागाचे आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यती हा जरी पारंपरिक खेळ असला तरी आता यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे, शर्यतीमध्ये मनगटी घड्याळाच्या आधारे सेकंद सांगण्याचे दिवस आता कालबाह्य झालेले आहेत हल्लीच्या काळात डिजिटल स्टॉप वॉच डिस्प्ले चा वापर शर्यतीमध्ये सर्रास होऊ लागला आहे, या डिजिटल माध्यमांमुळे ग्रामीण भागातील शर्यती आता हायटेक होऊ लागले आहेत..यामुळे निर्णयाची पारदर्शकता व अचूकता वाढीस लागली असून या निर्णय प्रक्रियेवर विश्वास ठेवून राज्यामध्ये बैलगाडा मालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे…
शर्यती मुळे देशी गोसंवर्धन व अर्थकारणास चालना:
बैलगाडा शर्यती मध्ये पूर्णपणे देशी गो वंशाचा सहभाग असतो, महाराष्ट्रमध्ये खिलार व उपजाती, कर्नाटक मध्ये हल्लीकर ,अमृतमहल ,तामिळनाडूमध्ये कांगायम बारगुर,आंध्रप्रदेश मध्ये ओंगोल,केरळ व पश्चिम किनाऱ पट्टी भागामध्ये मालनाड गिड्डा, पंजाब हरियाणा मध्यप्रदेश राजस्थान मध्ये नागोर या जातीचे बैल प्रामुख्याने शर्यती ,प्रदर्शन व धार्मिक कार्यक्रमासाठी वापरले जातात… बैलगाडा शर्यती मुळे वरील देशी गोवंशाचे व त्यांच्या उपजाती चे चांगल्या पद्धतीने संगोपन ,जतन ,संवर्धन होते.. शर्यत बंदी मुळे मागील दहा वर्षात वरील देशी गोवंशाची संख्या त्या त्या राज्यांमध्ये जवळपास 50 टक्के ने कमी झाली होती हे सरकारच्या पशुगणना अहवाल मध्ये समोर आले आहे.. परंतु आता शर्यती चालु झाल्यामुळे संगोपनाची प्रेरणा वाढीस लागणार आहे… ग्रामीण भागात प्रमुख आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यती मुळे लहान शा गावाला मोठ्या जत्रेचे स्वरूप येते ,शर्यतीच्या ठिकाणी अनेक ठिकाणाहून वाहनांमध्ये बैल हजेरी लावतात तसेच शर्यत पाहण्यासाठी शर्यत शौकिनांची गर्दी होते यातूनच स्थानिक बाजारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वस्तूंची मागणी वाढून उलाढाल होते, बैलगाडा शर्यतीचे बैलगाडा तयार करणारे कारागीर, बैलांसाठी उपयुक्त साहित्य तयार करणारे व विक्री करणारे कारागीर शर्यतीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून तर खाद्यपदार्थ पर्यंत गर्दीमुळे होणारी प्रचंड उलाढाल,ग्रामीण कलाकार ,वाजंत्री, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आली आहे, शर्यत बंदीच्या काळात खिलार वासरांची किंमत वीस तीस हजारावरुन आता लाखापर्यंत पोहोचली आहे.. तसेच बैलगाडा शर्यती मध्ये वेगवान धावणाऱ्या बैलाची किंमत पंचवीस ते तीस लाखापर्यंत पोहोचली आहे ,समाजातील आहे रे वर्गाकडून नाही रे वर्गाकडे होणारे हे पैशाचे हस्तांतरण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरत आहे…
धावणाऱ्या बैलांच्या ब्लड लाईन (वंशावळ) ची जपणूक : 
राज्यामध्ये खिलार जातीची पैदास करणारी जशी उच्चप्रतीची बैलांची वंशावळ आहे तसेच शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांच्या वंशावळ ची सुद्धा आवर्जून जपणूक केली जात आहे… शर्यतीमध्ये अधिक वेगाने धावणाऱ्या बैलांच्या वंशावळीतील वासरांना प्रचंड मागणी व किंमत आहे.. जगातला वेगवान धावपटू वूसेन बोल्ट 100 मीटर अंतर 9.58 सेकंदात पार करतो असे जागतीक रेकॉर्ड आहे… परंतु शर्यतीत धावणारी काही वेगवान बैल हेच 100 मीटर चे अंतर 8 सेकंदात पार करतात.ही या देशी गोवंशाची उपजत क्षमता ताकद आहे…लक्ष्या, सोन्या ,राजा ,नंद्या ,चंद्या ,सरदार, सुंदर , मन्या,भारत ,प्रधान ,ओम्या ,मुन्ना ,मोत्या ,शंभू, हिरा ,मास ,मॅगी, बजरंग ,पैंजण, हरण्या व इतर अशी ही शर्यतीतील वेगासाठी प्रसिद्ध असलेल्या बैलांची नावे आहेत, या बैलांच्या वंशावळीतील गाई वासरांना आज लाखात किंमत आहे. ग्रामीण भागातील गोपैदासकरांना यातून मोठे अर्थार्जन होते..

बैलांमध्ये असतात धावण्यास प्रवृत्त करणारे जीन्स:
घोडा प्रचंड वेगाने धावू शकतो कारण घोड्यामध्ये धावण्यास प्रवृत्त करणारे जीन्स असतात अशाच प्रकारचे जीन्स बैलामध्ये सुद्धा असतात याबाबतचे निष्कर्ष बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत नेमलेल्या तज्ज्ञ समितीने काढले आहेत, घोडा व बैलांमध्ये myostatin (MSTN allel) हे धावण्यास प्रवृत्त करणारे जनुक (gene) असते.. बैलगाडा शर्यती च्या केस मध्ये या समितीने दिलेल्या निष्कर्षांच्या आधारेच सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. यापूर्वी शर्यतीसाठी बैलांची निवड ही केवळ त्याची वंशावळ व बाह्य लक्षणावरून केली जात असे, परंतु संशोधनातील जनुका बाबतचे निष्कर्ष पुढे आल्याने पुढील काळामध्ये बाजारातून बैलाची शर्यतीसाठी खरेदी करताना ,निवड करताना या जनुकाची टेस्ट करून घेतल्यास व त्या बैला मध्ये myostatin हे जीन आढळून आल्यास त्याची शर्यती साठी धावण्याबाबत खात्री होणार आहे व निवड प्रक्रियेत मदत होणार आहे , सध्या हे तंत्रज्ञान फक्त घोड्यामध्ये निवडीसाठी वापरले जाते परंतु भविष्यात बैलांसाठी ही या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.

सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन तंत्रज्ञान :

पशुवैद्यक शास्त्रातील संशोधनातून आता भारतात सेक्स सॉर्टेड सीमेन हे पशुपालनातील नवीन तंत्रज्ञान पुढे आले आहे,लिंग निर्धारित रेत मात्रांचा कृत्रिम रेतनासाठी वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात कालवडींचा जन्म शक्य आहे. सध्याच्या स्थितीत भारतामध्ये विभिन्न प्रकारच्या जातींच्या वळूंच्या सेक्स सॉर्टेड रेत मात्रा उपलब्ध आहेत. त्यामुळे दुधाळ जनावरांमध्ये कालवडींची संख्या तसेच शर्यतीच्या जनावरांमध्ये नर वासरांची संख्या वाढवणे सहज शक्य आहे… या तंत्रज्ञानामुळे ब्रीडींग साठी गाईंची दूरवर वाहतूक टाळता येणे शक्य आहे तसेच जातिवंत वळूची वीर्य मात्रा सर्व दूर पोहोचवणे शक्य आहे…बैलगाडी शर्यती ह्या बैलांचे सामर्थ्य व आरोग्य प्रदर्शित करतात. महाराष्ट्रातील स्थानिक प्रजातीचे जतन करणे, वळूंच्या प्रजातींची शुद्धता अबाधित राखणे, तसेच त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे यात बैलगाडी शर्यतीची मोलाची भूमिका आहे.
शर्यतीच्या कायद्याची भूमिका :
बैलगाडा शर्यती चालू करण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एप्रिल 2017 मध्ये प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 मध्ये अमेंडमेंट करून शर्यतीस परवानगी दिली आहे ,राज्य शासनाने शर्यती चालू करण्यासाठी जरी कायदा केलेला असला तरी या कायद्यामध्ये काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, या नियमांचे पालन करणे व शर्यतीतील बैलांबाबत जबरदस्ती व छळ होणार नाही याबाबत आयोजक व सहभागी शेतकऱ्यांवर जबाबदारी निश्चित केलेली आहे.. यामध्ये शर्यती घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे ,शर्यतीसाठी 50000 चे डिपॉझिट सादर करणे, शर्यतीचे ठिकाणी धावपट्टी सुव्यवस्थित असणे तसेच शर्यतीचे ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी ,जनावरांची ॲम्बुलन्स ,बैलांसाठी पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची व्यवस्था ,उन्हामध्ये बैलांना सावलीची व्यवस्था तसेच प्रेक्षकांसाठी सुरक्षा कठडे ॲम्बुलन्स पिण्याचे पाणी या सर्व बाबतीत व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजकांवर निश्चित केली आहे.. शर्यतीचे ठिकाणी काठी चाबूक इत्यादी साहित्य विक्रीस मनाई करणे तसेच शर्यतीच्या वेळी बैलांना मारहाण करणे इत्यादी बाबीस मनाई करण्यात आली आहे, या कायद्याचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीस पाच लाखापर्यंत दंड व तीन वर्षाची शिक्षा अशी तरतूद या कायद्यात केलेली आहे, या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाल्यास बैलगाडा शर्यती निर्विघ्नपणे पार पडणार आहेत यापूर्वी बैलगाडा शर्यती बाबत एवढा सक्षम कायदा नव्हता त्यामुळे यापूर्वीच या शर्यती अनेक वेळा न्यायालयाने बंद केल्या होत्या, आता राज्य सरकारने अतिशय सक्षम कायदा तयार केल्यामुळे शर्यती अनेक वर्ष अबाधित चालू राहतील अशी अपेक्षा आहे परंतु या कायद्याने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न झाल्यास सर्वोच्च न्यायालय या शर्यती केव्हाही बंद करू शकते हेही तितकेच खरे आहे.. म्हणून ग्रामीण भागातील आयोजकांनी पूर्वपरवानगी घेऊन शर्यती आयोजित करणे शर्यतीच्या ठिकाणी कायद्यातील नियमांचे पालन करणे व शर्यतीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी बैलांना कोणत्याही प्रकारची मारहाण न करता शर्यती मध्ये भाग घेणे,बैल व घोडा एकत्र जुंपून शर्यत न घेणे,1000 मीटर पेक्षा जास्त अंतराच्या शर्यती न घेता शासनाच्या कायद्याचे पालन करणे ही काळाची गरज आहे….

ग्रामीण शर्यतीचे शहरातही ग्लॅमर:
बैलगाडा शर्यत चालू झाल्यानंतर ग्रामीण भागातील या शर्यतीचे आता शहरातही आकर्षण वाढू लागले आहे.. शर्यती मुळे खिलार गो संगोपनात ग्रामीण भागात वाढ होत असली तरी शहरातही गोपालन करणारे व बैलगाडा शर्यतीचे बैल सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे… नुकतीच भोसरी विधानसभा चे आमदार श्री महेश दादा लांडगे यांनी पुणे शहरातील पिंपरी चिंचवड या औद्योगीकरण असलेल्या भागात जाधव वाडी येथे भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले, या शर्यती साठी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या बक्षिसांची पर्वणी ठेवण्यात आली होती. शर्यतीमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना समवेत सहभाग नोंदवला असला तरी शहरी प्रेक्षकांची संख्या प्रचंड होती…. या बैलगाडा शर्यती मध्ये विजेत्यांसाठी जेसीबी मशीन ,बोलेरो गाडी ,ट्रॅक्टर व जवळपास 150 दुचाकी अशी दीड कोटी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. बक्षिसा सोबतच प्रेक्षकांसाठी सावलीची व्यवस्था, बसण्यासाठी स्टेडियम,पिण्याचे पाण्याची व्यवस्था असे सुंदर नियोजन करण्यात आले होते, या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून तसेच शेजारील मध्य प्रदेश राज्यातूनही बैलांनी सहभाग घेतला, भारतातील पंजाब हरियाणा तसेच परदेशातील नेदरलँड इत्यादी भागातील प्रेक्षक व मान्यवरांनी हजेरी लावली, या स्पर्धेतील लोकांचा सहभाग व गर्दीचा उच्चांक पाहून निमंत्रित पाहुणे म्हणून स्पर्धेस भेट देण्यासाठी उपस्थित असलेले आमदार श्री निलेश राणे यांनी पुढील स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून मर्सिडीस गाडीची घोषणा केली. या सर्व घडामोडींमुळे आमदार महेश दादा लांडगे यांनी आयोजित केलेली भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही सगळीकडे चर्चेचा विषय ठरली. एकंदरच ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यती चे आकर्षण आता सर्वदूर पोहोचत आहे तसेच या विषयाची क्रेझ आता शहरातही वाढत आहे, ग्रामीण बैलगाडा शर्यती मुळे परदेशी पर्यटकांचे ग्रामीण भागाकडे आकर्षण वाढत आहे.ग्रामीण भागातील कलाकारांनी तयार केलेल्या “नाद एकच बैलगाडा शर्यत” या गाण्यावर राज्यातील विविध भागात ऑर्केस्ट्रा ,तमाशा, लग्न समारंभ मधून तरुणाई चे पाय थिरकत आहेत… या गाण्यामुळे अद्याप शर्यती नसलेल्या भागातही शर्यती विषयीची उत्सुकता व आकर्षण वाढीस लागले आहे.

आता देशी गोवंश संवर्धन कायद्याची गरज :
राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीसाठी कायदा केल्याने देसी गोवंश चे अप्रत्यक्षरीत्या जतन संवर्धन होणारच आहे, परंतु देशी गोवंशाची शुद्धता जपली जावी म्हणून तामिळनाडू सरकारने तामिळनाडू ब्रीडिंग ॲक्ट 2019 तयार करून अंमलबजावणी चालू केली आहे, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा कायदा करण्याची गरज आहे, तामिळनाडूमध्ये यापूर्वी फ्रोजन सिमेन द्वारे विदेशी जातीच्या वळू चा देसी गाई सोबत संकर करण्यात येत होता त्यामुळे देशी गोवंशाची शुद्धता धोक्यात आली होती, शर्यतीसाठी देशी गोवंशाची शुद्धता धोक्यात येणे धोक्याचे ठरणार आहे, म्हणून तामिळनाडू तील कायद्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने याबाबत कायदा करून ब्रीडिंग (प्रजोत्पादन) साठी वापरल्या जाणाऱ्या बैलांचे पशुसंवर्धन विभागाकडे रजिस्ट्रेशन करणे सक्तीचे करणे गरजेचे आहे व या कायद्याचा भंग करणाऱ्यास एक लाखापर्यंत दंड करणे आवश्यक आहे यामुळे देशी गोवंशाची शुद्धता जपली जाण्यास मदत होणार असून शर्यतीच्या चांगल्या बैलांची पैदास करणे सोपे होणार आहे…
जगद्विख्यात शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन चा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे, या सिद्धांतामध्ये डार्विनने उपयुक्ततावाद (utility)सांगितला आहे, कोणत्याही सजीवाची उपयुक्तता संपली की त्याचे अस्तित्व धोक्यात येते हे नमूद केले आहे , त्यासाठी त्यांनी माकडापासून मानवाच्या उत्क्रांती पर्यंत माकडाची शेपटी उपयोग मुल्यअभावी नष्ट झाल्याचे उदाहरण दिले आहे..त्याचप्रमाणे देशी गोवंशाची उपयुक्तता जर संपली तर कालांतराने ही जात सुद्धा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही म्हणून बैलगाडा शर्यती ,जनावरांचे प्रदर्शन जनावरांचे विविध खेळ, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात जनावरांचा सहभाग तसेच सरकारने देशी जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यास देशी जनावरांचे उपयुक्तता मूल्य टिकून राहणार आहे, कृषी यांत्रिकीकरण औद्योगीकरण कीटकनाशकांचा वाढता वापर त्याचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबतीत देशी गोपालन गोसंवर्धन भविष्यात परिणामकारक ठरणार आहे हेही तितकेच खरे.. राज्य सरकारने गावोगावी बैलगाडा शर्यतीचे कायद्याबाबत जागृती करायला हवी लोकांना याबाबत साक्षर करायला हवे. ग्रामीण संस्कृती व परंपरा टिकून ठेवणाऱ्या गाव जत्रांनाच बैलगाडा शर्यत आयोजनासाठी परवानगी देण्यात यावी, वाढदिवस जयंती यानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या शर्यती बंद करण्यात याव्यात यासाठी पशुसंवर्धन विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना( एस ओ पी) निर्गमित करायला हव्यात…म्हणून गरज आहे शर्यतीचे कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची व शेतकऱ्यांनी जबाबदारीने नियम पाळण्याची तरच शर्यतीचा कायदा भविष्यात न्यायालयात टिकू शकेल.

श्री. संदिप बोदगे मु. पो. निघोज ता. पारनेर, जि. अहमदनगर.
संपर्क :  9028151515
(लेखक कृषी अर्थशास्त्रातील पदवीधर असून बैलगाडा शर्यतीचे अभ्यासक आहेत)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button