अधिका-यांना दालनात कोंडून आंदोलन केल्याने राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/ncp_logo759.jpg)
पिंपरी – विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत अधिका-यांना दालनात कोंडून केलेले आंदोलन राष्ट्रवादीला चांगलेच महागात पडले आहे. विनापरवाना जमाव जमवून महापालिकेत घोषणाबाजी केल्याचे कारण देत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेत शुक्रवारी (दि. 3) आंदोलन केले होते. आंदोलनात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना त्यांच्याच दालनात कोंडून दरवाजाला टाळे ठोकले होते. दरम्यान, जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार दीपक वणवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, समीर मासूळकर, मयुर कलाटे, सुलक्षणा धर, पोर्णिमा सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे यांना कोंडण्यात आले होते.