#Ratnagiri: सेल्फीचा मोह जिवावर बेतला, चिमुकल्यासह चुलत्याचा कोंडीवली डॅममध्ये बुडून मृत्यू
![#Ratnagiri: Selfie temptation kills, cousin with Chimukalya drowns in Kondivali dam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Ratnagiri-.png)
रत्नागिरी | चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी डॅममध्ये चारजण बुडाले होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. या घटनेला आठवडा होत नाही. तोच खेड तालुक्यातील कोंडिवली धरणात बुडून एका १० वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. धरण परिसरात फिरण्यासाठी गेले असताना सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन ही दुर्घटना झाली.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह रात्री उशिरा मिळाले आहेत. या घटनेत सुदैवाने अजून दोन लहान मुले पाण्याबाहेर राहिल्याने बचावली आहेत. ही ह्रदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी उशिरा ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
नेमकं काय घडलं?
खेड तालुक्यातील निळीक वरचीवाडी येथील इम्रान याकूब चौगुले (वय ४०) आणि सुहान फैजान चौगुले (वय १०) आणि मुलगी लाईबा (वय ८) आणि मुलगा याकूब (वय ४) हे चौघेजण कोंडिवली डॅमवर फिरण्यासाठी गेले होते. या डॅमवर सेल्फी घेण्यासाठी सुहान पाण्यात उतरला आणि याचवेळी दुर्देवाने त्याचा पाय घसरला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच इम्रान याकूब चौगुले हे त्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र, दुर्देवाने दोघेजण बुडाले.
ही माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी धरणावर धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ खेड पोलिसांना या दुर्घघटनेची माहिती देण्यात आली. खेड पोलिसांनी तात्काळ कोंडिवली धरणावर धाव घेत धरणात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यास सुरवात केली. धरणात मोठ्या प्रमाणात असलेले पाणी आणि महाकाय मगरींचा वावर यामुळे शोध घेण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र, पोलिसांनी शोधकार्य सुरुच ठेवले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धरणातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आहे.
पोलीस तपासात हा प्रकार सेल्फी काढताना घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी अधिक तपास खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करत आहेत.