महाराष्ट्र दिनाला राज आणि उद्धव ठाकरेंची जुगलबंदी रंगणार, आंबेडकरांचाही शांती मोर्चा
![Raj and Uddhav Thackeray's jugalbandi will be painted on Maharashtra Day, Ambedkar's peace march too](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Raj-and-Uddhav-Thackeray.jpg)
औरंगाबाद | दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी १ मे रोजी मोठ्या घडामोडी घडणार असून, यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार, तर याच दिवशी पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सभा घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान १ मे रोजीच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ‘शांती मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे १ मे रोजी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी होणार आहेत.
मनसेची सभेसाठी जय्यत तयारी; बाळा नांदगावकरांचा औरंगाबाद दौरा
गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच राज ठाकरे हे औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी सभा घेणार आहे. मशिदीवरील भोंग्यासोबतच ते औरंगाबादचे नाव बदलून सांभाजीनगर करण्याच्या होणाऱ्या मागणीवरून शिवसेनेवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सभेची मोठी चर्चा असून, राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
राज यांची १ मे ला सभा होत असतानाच आता उद्धव ठाकरे सुद्धा याच दिवशी पुण्यात सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच त्यांनी, लवकरात लवकर मला मोठी सभा घ्यायची आहे. तिकडे परत एकदा मास्क काढून बोलायचं आहे. त्या सभेत सगळ्यांचा एकदाचा काय तो परामर्श आणि सोक्ष मोक्ष लावून टाकायचाय, असे म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या या सभेत कोण-कोण निशाण्यावर असणार आहे, हे पाहणं सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.
प्रकाश आंबेडकर काढणार ‘शांती मोर्चा’
दरम्यान, १ मे रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तर दुसरीकडे याच दिवशी म्हणजे १ मी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी ‘शांती मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. येत्या ३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकते, त्यामुळेच आम्ही १ मे रोजी राज्यात शांती मार्च काढणार असून, या मार्चमध्ये येणाऱ्या प्रत्येक संघटनेचं स्वागत केलं जाईल. पण कोणत्याही राजकीय पक्षाला या मार्चमध्ये जागा दिली जाणार नसेल, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.