हार्बर रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत; नंतर समोर आलं धक्कादायक कारण
![Isku socodka tareenada dekedaha ayaa hakad galay in muddo ah; Dabadeed waxaa timid sababtii naxdinta lahayd](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Isku-socodka-tareenada.jpg)
मुंबई | हार्बर रेल्वेची वाहतूक सेवा सकाळी विस्कळीत झाली होती. पनवेल रेल्वे स्थानकातील सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने रेल्वेची सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. आता सिग्नल यंत्रणा दुरुस्त केल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लोकल सेवा सुरळीत झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, या बिघाडाचे कारणही समोर आलं आहे.
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. काही समाजकंटकांमी सिग्नल यंत्रणा, लोकेशन बॉक्स आणि केबलचं नुकसान केल्याने हा बिघाड झाला आहे. त्यामुळं हार्बर रेल्वेची सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल सेवा काही ठप्प झाली होती.
वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर तात्काळ रेल्वे विभागाकडून सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच सेवा सुरळीत झाली. सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांच्या सुमारास दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर सकाळपासून वाहतूक सुरळीत सुरू आहे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन या बिघाडासंदर्भात माहिती दिली आहे. तसंच, घटनास्थळावरचे काही फोटोही त्यांनी ट्विट केले आहे. समाजकंटकांनी केलेल्या या कृत्यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.