breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सरकार दरबारी कामे होत नसल्याची शिवसैनिकांची तक्रार

जालना |

मुख्यमंत्री जरी आपल्या पक्षाचे असले तरी आपली कामे सरकार दरबारी होत नाहीत, अशा तक्रारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क अभियानात उघडपणे केल्या. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी जालना जिल्ह्यातील बैठकीमध्ये अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्याचे वार्ताहर बैठकीत मान्य केले. ते म्हणाले, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे केलेल्या या तक्रारींचा अहवाल आपण पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. आवश्यकता भासल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेतेमंडळी या संदर्भात विचार करून निर्णय घेतील. तीन पक्षांचे सरकार असल्याने अशा प्रकारच्या थोडय़ाफार कुरबुरी होतात.

केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजप राज्यातील शिवसेनेच्या नेतेमंडळींना त्रास देण्याचे काम करीत आहे. राज्यातील विविध खात्यांना कमी-अधिक निधी मिळत असल्याच्या संदर्भात उघड चर्चा झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच राज्य सरकारने मागील दोन वर्षांत केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भात शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आल्याचे खासदार बारणे यांनी या वेळी सांगितले. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या वार्ताहर बैठकीस होती.

दरम्यान, गुरुवारी मंठा येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे परतूर विधानसभा मतदार संघात शिवसेना भाजपशी एकाकी लढत देत आहे. या मतदार संघात शिवसेनेची मोठी ताकद निर्माण झालेली आहे. भविष्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढायची असेल, तर कार्यकर्ते अधिक सक्षम कसे होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. आपली ताकद आणखी वाढून कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळाले तर परतूर विधानसभा मतदार संघातून भाजप संपल्याशिवाय राहणार नाही. या वेळी अर्जुन खोतकर यांनी भाजपवर टीका केली. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या ताब्यात आलेल्या मंठा नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला. या वेळी खासदार बारणे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे म्हणणे आणि अडचणी समजावून घेतल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button