भारत-वेस्ट इंडिज ट्वेन्टी-२० मालिका : हेटमायरकडे पुन्हा दुर्लक्ष
![India-West Indies Twenty20 Series: Hetmeyer ignored again](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/west-indias.jpg)
भारताविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेसाठी आक्रमक डावखुरा फलंदाज शिम्रॉन हेटमायरला वेस्ट इंडिजच्या संघात स्थान लाभलेले नाही. इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतीलच १६ खेळाडूंचा संघ वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने कायम राखला आहे.भारत-विंडीज यांच्यात ६ फेब्रुवारीरापासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार असून त्यानंतर उभय संघांत तीन ट्वेन्टी-२० लढतीही होणार आहेत. एकदिवसीय सामने अनुक्रमे ६, ९ आणि ११ तारखेला अहमदाबाद येथे होतील, तर १६, १८ आणि २० फेब्रुवारीला कोलकाता येथे ट्वेन्टी-२० लढती रंगतील. विंडीज क्रिकेट मंडळाने अनिवार्य केलेली तंदुरुस्ती चाचणी पार करण्यात हेटमायर अपयशी ठरल्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले होते. मात्र आताही त्याच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही. किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील या संघात रॉस्टन चेस, कायले मेयर्स, शेल्डन कॉट्रेल, डॉमनिक ड्रेक्स आणि रोवमन पॉवेल यांना स्थान लाभले आहे. केमार रोच, एन्क्रूमा बोनर, शामरा ब्रूक्स आणि अल्झारी जोसेफ हे चार खेळाडू एकदिवसीय मालिकेनंतर मायदेशी परततील.
किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन अॅलन, डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, रॉस्टन चेस, कायले मेयर्स, शेल्डन कॉट्रेल, डॉमनिक ड्रेक्स, शाय होप, अकील होसेन, ब्रेंडन किंग, रोवमन पॉवेल, रोमारिओ शेफर्ड, ओदेन स्मिथ, हेडन वॉल्श कनिष्ठ.
शाहरूख, साई किशोर राखीव खेळाडू
नवी दिल्ली : तमिळनाडूचा धडाकेबाज फलंदाज शाहरूख खान आणि फिरकीपटू आर. साई किशोर यांचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शाहरूख आणि साई किशोर यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
‘कसोटी कर्णधारपदासाठी रोहित योग्य’
नवी दिल्ली : रोहित शर्मा हा भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य पर्याय असल्याचे मत विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका पराभवानंतर कोहलीने भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रोहितसह के. एल. राहुल, ऋषभ पंत यांची नावे भारताच्या नेतृत्वपदाच्या शर्यतीत आहेत. ‘‘भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहितव्यतिरिक्त एकही खेळाडू मला तितका प्रगल्भ वाटत नाही. त्याने आयपीएलमध्ये नेतृत्वकौशल्य सिद्ध केले आहे. त्यामुळे एकदिवसीय, ट्वेन्टी-२०नंतर आता कसोटी प्रकारातील नेतृत्वाची धुराही त्याच्याकडेच सोपवणे भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे ठरेल,’’ असे राजकुमार म्हणाले.