पिंपरी-चिंचवड शहर परिसरात तीन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू, सहाजण गंभीर जखमी
![A 63-year-old senior citizen was killed in a car crash](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Accident.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत हिंजवडी आणि चाकण परिसरात तीन अपघात झाले. या तीन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पहिला अपघात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथे घडला. उमेश शिदास चौधरी (वय 28, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मित्र अक्षय विनोद ठाकरे (वय 28, रा. एसीबी रोड पुणे) याचा अपघातात मृत्यू झाला आहे. ठाकरे हा रविवारी (दि. 5) दुचाकीवरून बावधन ब्रिजवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये ठाकरे याचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण-शिक्रापूर रस्त्यावर झाला. राजू सोपान केदारी (वय 29, रा. काळेवाडी, करंजगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रविवारी मध्यरात्री बारा वाजता भोसे येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघाले. त्यांनी घरी जाण्यासाठी एका दुचाकीला लिफ्ट मागितली. त्यावेळी गजानन भांडवले (रा. खालूंब्रे, ता. खेड) यांनी त्यांची दुचाकी थांबवली. फिर्यादी केदारी हे भांडवले यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या एका दुचाकीने भांडवले यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. यात फिर्यादी, भांडवले आणि समोरच्या दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले आहेत. समोरच्या दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरा अपघात चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण शिक्रापूर मार्गावर घडला. अण्णासाहेब सोपानराव धनक (वय 47, रा. शिवराई, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) हे या अपघातात जखमी झाले आहेत. धनक यांनी त्यांच्या ट्रकमध्ये औरंगाबाद येथून चाकण येथे माल आणला होता. तो माल त्यांनी चाकण येथील कंपनीत खाली केला. त्यानंतर ते दुसरा माल भरण्यासाठी शिक्रापूरकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या एका कंटेनरने धनक यांच्या ट्रकला समोरून धडक दिली. यात फिर्यादी यांच्या मांडीचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली आहे.