होम क्वारंटाईन रूग्णांना कम्युनिटी किचनचा आधार; प्राधिकरणातील सुवर्णयुग तरुण मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
![Community kitchen base for home quarantine patients; Commendable initiative of Suvarnayug Tarun Mitra Mandal in the authority](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/WhatsApp-Image-2021-05-23-at-6.18.36-PM-1.jpeg)
- नगरसेविका शर्मिलाताई बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर यांचा पुढाकार
पिंपरी |
होम क्वारंटाईन झालेल्या रुग्णांना, तसेच त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कोरोना योध्दे डॉक्टर, नर्स यांना निगडी प्राधिकरणातील सुवर्णयुग तरुण मित्र मंडळाच्या दररोज मोफत जेवण पुरविण्यात आले. नगरसेविका शर्मिलाताई बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या कम्युनिटी किचनचा त्यांना आधार मिळाला. एका महिन्यात सुमारे अडीच हजार नागरिकांना या उपक्रमात सकस आहार पुरविण्यात आला. कोरोनाच्या दुस-या लाटेत आजूबाजूची परिस्थिती बदलत गेली. कोरोनामुळे खूप सारी लोकं बाधित झाली. कुटुंबातील सर्वच जण कोरोना बाधित झाले. काही कुटुंबामध्ये घरातील स्त्री, घरातील वडीलधारी माणसे, काही घरात संपूर्ण कुटुंब होम क्वारंटाईन आहेत.
परंतु, आजारपणामध्ये औषधोपचाराबरोबर सकस व योग्य आहार घेणे गरजेचे असते. तसेच, जेवणासाठी रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक घराबाहेर पडल्यास कोरोना प्रादुर्भाव वाढण्याता धोका होता. ही बाब विचारात घेऊन सुवर्णयुग मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांना मोफत जेवण पुरविण्याची सेवा सुरू केली. निगडी प्राधिकरणातील वीर सावरकर मैदान येथे किचन सुरू करण्यात आले. उत्कृष्ट स्वयंपाकीमार्फत स्वच्छता राखत पौष्टिक व दर्जेदार जेवण दररोज तयार केले जाते. ते कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मोफत घरपोच दिले जाते. मागील एका महिन्यापासून हे कम्युनिटी किचन सुरू आहे. दररोज 70 ते 80 जेवणाचे पार्सल घरपोच पुरविले जाते. ताजे, स्वच्छ, सकस आणि पौष्टिक जेवण त्यांना दिले जाते. सुमारे अडीच हजार रुग्ण, नातेवाईक व कोरोना योध्दे यांना या उपक्रमामुळे मदत झाली. या उपक्रमाच्या संयोजनात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर यांच्यासह विजय शिनकर, योगेश भागवत, विजय नेहेरे, राहूल सुर्यवंशी, नितीन हागवणे, किरण पोतनीस यांनी पुढाकार घेतला.