शहरातील लॉटरी सेंटर्सवर कारवाई करा; पोलीस उपायुक्तांना राष्ट्रवादीतर्फे निवेदन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/maharashtra-newly-joined-ncp-candidate-rahul-narvekar-to-contest-from-maval_180314023154.jpg)
पिंपरी – शहरातील निगडी, आकुर्डी, थरमॅक्स चौक आदी भागांमध्ये ऑनलाईन लॉटरी सेंटर्सच्या नावाखाली अवैध धंदे सुरू ठेवून लाखो रुपयांची कमाई केली जात आहे. या लॉटरी सेंटर्सच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी बेकायदेशीर पध्दतीने सुरू असलेल्या या धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात साने यांनी शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निगडी, आकुर्डी, थरमॅक्स चौक, तळवडे, केएसबी चौक, चिखली गाव, त्रिवेणीनगर, साने चौक, आदी परिसरात ऑनलाईन लॉटरी सेंटर्स सुरू आहेत. विविध राज्यातील ऑनलाईन लॉटरीची तिकीटे या सेंटर्सवर विक्री केली जातात. त्यामुळे ही लॉटरी सेंटर्स परप्रांतियांचे अड्डे बनली आहेत. या सेंटर्समध्ये गैरप्रकारही चालवले जातात. त्याद्वारे लाखो रुपयांचा गल्ला गोळा केला जातो. मात्र, येथे ये-जा करणा-या ग्राहकांमध्ये पैशांवरून टोकाचे वाद होतात. त्याचा त्रास येथील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
याठिकाणी मटका, जुगार खेळला जातो. सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित करून देशोधडीला लावण्याचा उद्योग याठिकाणी खुलेआम सुरू आहे. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हे सर्व प्रकार खुलेआम चालतात. तरीही, पोलीस याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. लॉटरी सेंटर्सच्या नावाखाली चालणारे गैरप्रकार बंद करण्यासाठी त्वरीत कार्यवाही हाती घ्यावी. संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.