पुणेकरांनो विनाकारण बाहेर पडणार असाल तर सावधान; आजपासून निर्बंध आणखी कडक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Police-Checking-lockdown-checkpost-e1619080982862.jpg)
पुणे – महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्याबरोबरच राज्यात वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही सुरु आहे. पुण्यातही लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात होती. पण तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असताना आढळून येत होते.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आज दुपारी 12 वाजल्यापासून पुण्यातील लाॅकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, यासाठी पोलीस आता कडक कारवाई करणार आहेत.
नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा आपल्याला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. अशाप्रकारचं आवाहन पुणे पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. आज दुपारी 12 नंतर पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे, तसेच वैध कारण न आढळल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती आणि उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर पुणे पोलिसांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. यापूर्वीही वाहनांची तपासणी केली जात होती. पण त्यातून काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली होती. पण आता पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12 नंतर विनाकारण पुणेकर रस्त्यावर फिरताना आढळले तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.