केंद्र सरकारची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण
![In India, 48,786 new corona patients, 1,005 corona victims in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-5174671_1920-1-4.jpg)
मुंबई – देशभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य अधिकारी व इतर सरकारी व खाजगी रुग्णालयांमधील कोरोनायोद्ध्यांना केंद्र सरकारतर्फे 50 लाखांचं विमा संरक्षण मागच्यावर्षी देण्यात आलं होतं. 30 मार्च 2020 ला केंद्र सरकारने हा निर्णय घोषित केला होता.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा देण्याचं केंद्र सरकारने मंजूर केलं होतं. त्याबरोबरच, या योजनेच्या प्रीमियमची रक्कम केंद्र सरकारकडूनच भरली जाणार, हे देखील सांगण्यात आलं होतं. यासंदर्भात ज्या खाजगी रुग्णालयांनी कोरोनावर उपचार सुरू असल्याची नोंदणी केलेली आहे. अशा रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
मागच्या वर्षभरात या योजनेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली असून 20 मार्च 2021 ला ही मुदत संपली होती. परंतु, नंतर केंद्र सरकारने जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यथा लक्षात घेत 24 एप्रिलपर्यंत येणारे सर्व क्लेम स्वीकारण्याचे आदेश राज्य सरकारला केले. परंतु, मुदतवाढ नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे आता कोरोना योद्ध्यांना आणखी 180 दिवसांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 40 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच यापूर्वी तब्बल 59 जणांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये विम्याची रक्कम बहाल करण्यात आली आहे. तर, 26 प्रस्ताव नाकारण्यात आले असून 91 प्रस्ताव हे विचाराधीन ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.