#Covid-19: करोना विषाणूच्या कहरामुळे बासमतीच्या दरांत घसरण
- अंतर्गत मागणीत घट झाल्याचा परिणाम
पुणे |
करोनाचा संसर्ग पुन्हा वाढीस लागल्यानंतर बासमती तांदळाच्या दरात घसरण झाली आहे. राज्यातील उपाहारगृहे, खाणावळींवर निर्बंध असून विवाहसमारंभातील उपस्थितीवर निर्बंध असल्याने बासमती तांदळाच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे बासमतीचे दर क्विंटलमागे एक हजार ते दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत. किरकोळ बाजारातही बासमती तांदळाच्या दरात प्रतिकिलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी घट झाली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्यावेळी भारतातील बासमती तांदळला परदेशातून चांगली मागणी होती. गेल्या आर्थिक वर्षात ४५ लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली. करोनाचा संसर्ग असूनही निर्यात चांगली झाल्याने बासमती उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात व्यवहार काही प्रमाणात सुरळीत झाले. उपाहारगृह चालकांकडून, खानावळ चालकांकडून, विवाह समारंभासाठी बासमती तांदळाची मागणी वाढली होती.
कारणे काय?
मार्च ते जून महिना लग्नसराईचा म्हणून ओळखला जातो. मात्र, ऐन लग्नसराईत करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने बासमती तांदळाच्या मागणीत गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून घट झाली. उपाहारगृहे, खाणावळींवर निर्बंध असल्याने बासमती विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे, असे निरीक्षण पुणे मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी, जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी नोंदविले.
- थोडी माहिती…
भारतात पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बासमतीची लागवड करतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पारंपरिक बासमती तांदळाबरोबरच बासमतीच्या अन्य जातींच्या लागवडींकडे उत्तरेकडील शेतक ऱ्यांचा कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून ११२१, १५०९, १४०१ अशा प्रकारच्या जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. पारंपरिक बासमती तांदळासह देशातून अन्य बिगर बासमती तांदळाची निर्यातही वाढत आहे. वर्षारंभी किरकोळ बाजारात एक किलो बासमतीला ९० ते १२० रुपये असा दर मिळाला. करोना संसर्ग वाढल्यानंतर कार्यक्रम, लग्नसोहळे थांबले. त्यामुळे बासमतीच्या मागणीत एकदम घट झाली. त्यामुळे दरात घसरण झाली. आता किरकोळ बाजारात एक किलो बासमती ९० ते १०० रुपयांना मिळत आहे. – राजेश शहा, तांदूळ व्यापारी, पुणे.
वाचा- धक्कादायक! सासूसोबत अनैतिक संबंध; जावयाने केला गळा आवळून खून