कोरोनाकाळात काम करणारे विद्युत कर्मचारी व अधिका-यांना कोविड लस द्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Santosh-Saundankar.jpg)
- शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांची मागणी
- पुणे विभागाच्या प्रादेशिक संचालकांना दिले निवेदन
पिंपरी / महाईन्यूज
राज्यात मार्च २०२० मध्ये कोविड १९ मुळे लॉकडाऊन लावण्यात आला. या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये महावितरणाच्या महसूल प्राप्तीवर विपरित परिणाम झाला. पुणे जिल्ह्यात थकीत वीजबिलासाठी महावितरणकडून वसुलीचा धडाका सुरू झाला. मार्चअखेरमुळे कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले आहे. आजही पुणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. या जीवघेण्या परिस्थितीतही महावितरणाच्या महसुलासाठी व जिल्ह्यातील हजारो ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आहोरात्र काम करत आहेत.
यादृष्टीने महावितरणचे कर्मचारी कोरोना योध्ये ठरले आहेत. मात्र, या खऱ्या कोरोना योद्ध्यांना कोविड १९ च्या लसीकरणापासून वंचित ठेवले जात आहे. महावितरणाकडून ही बाब राज्य शासनाच्या लक्षात आणून द्यावी. वसुली व कार्यक्षेत्रातील अभियंता, तंत्रज्ञ व कर्मचारी यांना कोविड १९ चे लसीकरण करण्यास राज्य शासनाकडून मान्यता घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य व शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी पुण्याच्या प्रादेशिक संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासन कोरोनाचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी विजेची उपलब्धता सुनिश्चित ठेवण्याची मोलाची कामगिरी पार पाडत आहेत. नागरिक घरात असताना महावितरणाने २४ तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. हे करत असताना अनेक अधिकारी व कर्मचारी बांधवांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यातून ते सहीसलामत बरे होऊन पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले. या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे काहींना आपले प्राणही गमवावे लागले.
लॉकडाऊन परिस्थितीमध्ये महावितरणाच्या महसूल प्राप्तीवर विपरित परिणाम झालेला आहे. यातच अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्ग हा वीज देयक वसुलीसाठी सतत बाहेर फिरत आहे. पुणे शहर तसेच जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गाला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खऱ्या कोरोना योद्ध्यांना कोरोना लसीकरणाची नितांत गरज आहे. शासन स्तरावर त्यासाठी मान्यता मिळवावी. योग्य तो पत्रव्यवहार संबंधित खात्यास करावा व सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. सर्वप्रथम कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य महत्वाचे आहे. तरच कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत राहण्यास मदत होईल, असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.