राज्यपालांना १२ आमदारांवर पीएचडी करायचीय का?
नवी दिल्ली – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट अशी सरकारविरोधातील १०० गैरप्रकरणे सादर केली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल आणि भाजपवर टीका करताना, ‘राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भूमिका ही संशयास्पद असून राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे,’ अशी बोचरी टीका केली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जाणार आहे, असेही सांगितले होते. मात्र आता ही भेट टळली असून, राज्यपाल उत्तराखंडच्या दौऱ्यावर गेले असल्याचे, राज्यपाल भवनाकडून त्यांना सांगण्यात आले.
वाचा :-\भारतात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद; गेल्या पाच महिन्यातील उच्चांक
दरम्यान, या सगळ्या घडामोडींवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका होणारच, असे सांगत, जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत राज्यपालांवर आम्ही टीका करणारच, असे बुधवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित करून, राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
“राज्यपाल आजकाल खूपच व्यस्त आहेत, त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ आहे की नाही हेही मला माहिती नाही. मात्र, गेल्या २ दिवसांपासून भाजपच्या लोकांचं राजभवनमध्ये येण-जाणं, खाणं-पिणं चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. त्या १२ नावांचं काय झालंय, यावर राजभवनमधून खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करत आहेत ते ठीक आहे, पण यातून काय त्यांना पीएचडी वगैरे मिळवायची आहे का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
“घटनात्मकदृष्ट्या आम्ही जी नावं पाठवली ती, आपल्या मांडीखाली दाबून एखादा गिनीज बुकमधील विक्रम करायचाय का राज्यपालांना हाही अभ्यासाचा विषय आहे. राज्य सरकारबद्दल राज्यपालांनी आजपर्यंत जी भूमिका घेतलीय, त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात राजभवनाविषयी संभ्रम निर्माण झालाय, असेही राऊत यांनी म्हटले.