राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा, राजू शेट्टींची मागणी
बारामती – लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिल आले होते. अनेकांनी हे बील भरलेच नसल्याने आता महावितरणाने वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. वीज देयकाची मोठी थकबाकी असल्याने महावितरणाकडून हे पाऊल उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, विरोधी पक्षांनी मात्र या मुद्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे अशी मागणी केली आहे.
वाढीव वीज बिल भरण्यास विरोध करत राजू शेट्टी म्हणाले की, वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही. सरकारने शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे.दरम्यान, या मुद्यावर भाजप देखील आक्रमक झाले असून, शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या नोटिसा मागे घ्या अन्यथा, येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यात एमएसएईबीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.





