आंबेडकर चौक ते पिंपरी उड्डाणपूल या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद
![Ambedkar Chowk Te Pimpri Udanpool or Rasta Wahutukisathi closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Pimpri1.jpg)
– पहिल्या टप्प्यातील उड्डाणपुलाच्या कामासाठी निर्णय
पिंपरी । प्रतिनिधी
आंबेडकर चौक ते पिंपरी उड्डाणपूल या दरम्यानचा रस्ता आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे टप्प्याटप्प्यात काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गोकुळ हॉटेल ते पिंपरी पूल दरम्यानचे उड्डाणपुलाचे काम होणार आहे. त्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. अचानक झालेल्या बदलामुळे वाहनधारकांमध्ये देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
आंबेडकर चौकातून पिंपरी उड्डाणपुलाकडे वळणाऱ्या रस्त्यावर बॅरीगेट लावण्यात आले आहेत. पुणे-मुंबई महामार्गाने सरळ जाऊन अहिल्यादेवी होळकर चौकातून डावीकडे वळून नागरिकांना पिंपरी उड्डाणपुलावरून इच्छित स्थळी जाता येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने पिंपरी चौकातून अहिल्यादेवी चौक मार्गे पिंपरी पुलाकडे वळविण्यात आली आहेत. उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामादरम्यान अहिल्यादेवी चौक ते पिंपरी पूल या दरम्यानची वाहतूक दुहेरी मार्गाने राहणार आहे. पुलाखाली राहणाऱ्या स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिक यांना क्रोमा शोरूम मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.