केंद्र सरकारच्या निषेधार्थ 80 व्या वर्षी ‘ते’ करणार उपोषण
![He will go on a hunger strike in the 80th year to protest against the central government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/PHOTO-1.jpg)
पिंपरीतील माजी सैनिकाचा निर्धार
पिंपरी | प्रतिनिधी
30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी माजी सैनिक व पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर हे एक दिवसीय उपोषण करणार आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी हा निर्धार करत शेतकरी बांधवाप्रती आदर व्यक्त केला आहे. 1 जानेवारी 2021 रोजी ते एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती रुपनर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने कोरोना महामारीच्या काळात शेतक-यांचे न्याय हक्क डावलणारे आणि भांडवलदारांच्या फायद्याचे ठरतील असे शेतकरी विरोधी कायदे संसदेत चर्चेविना मंजूर केले. हे काळे कायदे मागे घ्यावे म्हणून मागील 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी बंधू, भगिनी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे हे देखील जानेवारी महिन्यात दिल्लीत उपोषण करणार आहेत. सैन्यात आण्णा हजारे यांच्या बरोबरच सेवा बजावणारे पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण रुपनर हे वयाच्या 80 व्या वर्षी शुक्रवारी 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्यांच्या बरोबर पोस्टातील निवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ खंडाळे हे देखील उपोषणात सहभाग घेणार आहेत.