फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा – उद्धव ठाकरे; वाचा काय म्हणाले
![Fadnavis shall lead at the centre, says CM](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Fadnavis-shall-lead-at-the-centre-says-CM.jpg)
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय व्हावं असं मला वाटतं. मला वाटतं की, ही सुधीर मुनगंटीवार यांचीही हीच इच्छा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिश्कील टोला लगावला. यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्या मित्राच्या मागे का लागता असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांना विचारला. यामुळे विधानभवनात हास्यकल्लोळ सुरू झाला.
यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या मागे लावण्यात आलेल्या ईडीच्या ससेमिराबाबतही भाष्य केलं. “महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोललं तर तुरुंगात टाकलं जातं. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोपही आमच्यावर करण्यात आला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला. त्यांच्या मुलांचीही चौकशी करण्यात आली. नशीब त्यांना नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळं काय आहे? ही विकृतीच आहे. असं विकृत राजकारण आम्ही करत नाही” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं.
वाचाः सुधीर मुनगंटीवारांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारीवरून उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
हे कौतुकास्पद नाही का?
“करोना संकटामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आपण करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. चीननं १५ दिवसांमध्ये त्यांच्याकडे रुग्णालय उभारलं याचं सर्वांना कौतुक आहे. पण मुंबईत १७ दिवसांत फिल्ड हॉस्पीटल उभारलं हे कौतुकास्पद नाही का?,” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.